तीन महिन्यातच रस्त्याची दुरवस्था
By admin | Published: June 3, 2017 02:15 AM2017-06-03T02:15:57+5:302017-06-03T02:15:57+5:30
: देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या चिंचोली (प्रभाग सहा) येथील गेल्या अनेक वर्षांपासून काही भागातील दुरवस्था झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती, सुधारणा
लोकमत न्यूज नेटवर्क
देहूरोड : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या चिंचोली (प्रभाग सहा) येथील गेल्या अनेक वर्षांपासून काही भागातील दुरवस्था झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती, सुधारणा व डांबरीकरण प्राधान्याने होणे अपेक्षित असताना सुस्थितीतील एका रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. डांबरीकरण केलेला दुसऱ्या एका रस्त्याची महिन्यातच दुरवस्था होऊ लागली आहे. गेल्याच महिन्यात गटारींचे काम करणाऱ्या ठेकेदाराने निकृष्ट काम केल्याचे उघड झाले असताना रस्त्याच्या ठेकेदारानेही दर्जा राखला नसल्याचे दिसून येत आहे. जनतेच्या पैशांचा अपव्यय होत असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत.
बोर्डाच्या वतीने गेल्या महिन्यांत चिंचोलीतील छत्रपती शिवाजीमहाराज पुतळा ते जाधव आळी दरम्यानचा रस्ता डांबरीकरण करण्यात आला. याकरिता बोर्डाने तेरा लाखांहून अधिक रक्कम खर्च केल्याचे सांगण्यात आले. वास्तविक या रस्त्यावर गटारींची कामे करताना गेल्या महिन्यात ठेकेदाराकडून पाईप टाकण्यासाठी दोन आडवे चर खोदण्यात आले होते. या व्यतिरिक्त एकही खड्डा या रस्त्यावर नसताना संपूर्ण रस्ता डांबरीकरण केल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. चिंचोलीतील मुख्य चौकातील मारुती- विठ्ठल रखुमाई व महादेव मंदिरासमोरचा दुरवस्था झालेला रस्ता गेल्या १५वर्षात दुरुस्ती, सुधारणा व डांबरीकरण करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. नव्याने डांबरीकरण केलेला रस्ता उंच झाला असून व मंदिरासमोरच्या रस्त्यावर खोलगट भाग निर्माण झाला आहे. दोन्ही मंदिरासमोरच्या भागातील अगोदरच दुरवस्था झालेल्या रस्त्यावर येत्या पावसाळ्यात पाणी साचून राहणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. चिंचोलीत डांबरीकरण करण्यात आलेले दोन रस्ते दोन ठेकेदारांमार्फत करण्यात आले आहेत.
प्राधान्यक्रम : आदेशास केराची टोपली
कॅन्टोन्मेंटने गेल्या महिन्याच्या सुरुवातीला चिंचोलीतील अशोकनगरच्या सीमाभिंतीच्या बाजूने खरे चाळ, भेगडे आळीपासून पुढे बालघरे आळी भागातील रस्त्याचे डांबरीकरण केले आहे. याकरिता सुमारे २४ लाख रुपये खर्च करण्यात आल्याचे स्थापत्य विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले. गेल्या महिन्यात दुरुस्ती सुधारणा, काही भागात रुंदीकरण व डांबरीकरण केलेल्या रस्त्याची काही दिवसातच दुरवस्था होण्यास सुरुवात झाली असून नागरिकांनी रस्त्याच्या कामाच्या दजार्बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काही ठिकाणी हा रस्ता खचला असून त्यावर मोठ्या भेगा आहेत. काही ठिकाणी रस्ता फुगला असून तेथेही खड्डे पडणार असल्याचे दिसत आहे.
कॅन्टोन्मेंट निवडणुकीनंतर मार्च २०१५ मध्ये झालेल्या बोर्डाच्या बैठकीत तत्कालीन अध्यक्ष ब्रिगेडियर सैफ खान यांनी विकासकामे करताना कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करून कामे करण्याबाबत स्पष्ट सूचना दिल्या होत्या. मात्र, कॅन्टोन्मेन्टने चिंचोलीत विविध विकासकामे करताना कोणताही प्राधान्यक्रम पाळला जात नसल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, बोर्डाच्या कोणत्याही प्रभागात सदस्यांनी सुचविलेली कामे करण्यात येत असल्याचे एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे.