हिंजवडीतील ज्वेलर्सवर दरोडा; सांवतवाडी पोलिसांकडून घेतले ताब्यात, तिघांना ५ दिवसांची पोलीस कोठडी
By नारायण बडगुजर | Published: August 7, 2024 07:11 PM2024-08-07T19:11:38+5:302024-08-07T19:12:02+5:30
हिंजवडी येथे लक्ष्मी चौकात वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या सराफी दुकानात शुक्रवारी (दि. २ ऑगस्ट) सकाळी दहाच्या सुमारास दरोडा टाकला होता
पिंपरी : हिंजवडी येथील लक्ष्मी चौकातील सराफी दुकानावर भरदिवसा दरोडा टाकून पळालेल्या तिघांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटात सावंतवाडी पोलिसांनी पकडले होते. त्यांच्याकडून दोन बंदुकासह जिवंत काडतुसेही हस्तगत केली. याप्रकरणी सावंतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून येथील न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. मंगळवारी (दि. ६) पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर पुन्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर या तिघांचा ताबा पिंपरी-चिंचवड पोलिसांनी घेतला. पुणे येथील शिवाजीनगर न्यायालयात बुधवारी हजर केले असता तिघांना पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात आली.
अल्ताफ बाबू खान (२४), गोविंद भवरालाल दिवाणी (२३), रातुराम कृष्णराम बिष्णोई (२६), अशी संशयितांची नावे आहेत. त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून हिंजवडी येथील लक्ष्मी चौकातील सराफी दुकानावर दरोडा टाकला होता. त्यानंतर पळून जाऊन त्यांनी मुंबई-गोवा महामार्गावरून गोवा गाठले होते, तर एक दिवस गोवा येथे थांबून ते पिंपरी-चिंचवड पोलिसांना चकवा देण्याच्या उद्देशाने पुन्हा पुण्याच्या दिशेने निघाले होते. त्याचवेळी त्यांना आंबोली घाटात सावंतवाडी पोलिसांकडून चेकमेट करण्यात आले. यावेळी त्यांच्या कारसह दोन बंदुका, तसेच जिवंत काडतुसे आणि मुद्देमाल हस्तगत केला होता.
दोन बंदुकांसह जिवंत काडतुसे सापडल्याने सावंतवाडी पोलिसांनी या संशयितांविरुद्ध सावंतवाडीत गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्यांना सावंतवाडी येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाकडून तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. ही पोलिस कोठडीची मुदत मंगळवारी संपल्यानंतर पुन्हा न्यायालयात हजर केले असता, त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर हिंजवडी पोलिसांनी या संशयितांचा ताबा घेत त्यांना अटक केली.
हिंजवडी येथे लक्ष्मी चौकात वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या सराफी दुकानात शुक्रवारी (दि. २ ऑगस्ट) सकाळी दहाच्या सुमारास दरोडा टाकला. दरोडा प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेसह स्थानिक हिंजवडी पोलिसांची पथके संशयितांच्या मागावर होती. दरम्यान, सावंतवाडी पोलिसांनी दरोडेखोरांना पकडल्यानंतर हिंजवडी पोलिसांचे पथक सावंतवाडीत दाखल झाले.