चिखलीत दरोड्याचा प्रयत्न :पाच लाखांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 02:40 PM2019-01-22T14:40:36+5:302019-01-22T14:53:33+5:30
भांड्याच्या दुकानात घुसून पाच जणांच्या टोळक्यांनी दोघांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्याकडे पाच लाखांची मागणी केली
पिंपरी :भांड्याच्या दुकानात घुसून पाच जणांच्या टोळक्यांनी दोघांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्याकडे पाच लाखांची मागणी केली. तसेच दुकानातील भांडी रस्त्यावर फेकून देत गल्ल्यात जमा झालेली ७ हजार ३०० रुपयांची रक्कम जबरदस्तीने हिसकावून नेली. ही घटना रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास साने चौकातील साईबाबा मंदिराजवळील भांड्याच्या दुकानात घडली.
या प्रकरणी दुकानाचे मालक अमित महादेव साठे (वय १८, रा. भीमशक्तीनगर, स्पाईन रोड, साने चौक, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, बंड्या, सुजित, आकाश, संतोष, गणेश या पाच आरोपीविरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमित यांचे साने चौकातील साईबाबा मंदिराजवळ भांडी विक्रीचे दुकान आहे. दुकानावर त्याचे मेहुणे आणि आई असतात. रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास अमित याचे मेहुणे आणि आई दुकानावर असताना बंड्या, सुजित, आकाश, संतोष आणि गणेश हे पाचही आरोपी त्यांच्या दुकानात आले. त्यांनी त्यांच्याकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागीतली. तसेच पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर दुकानातील विक्रीसाठी ठेवलेली भांडी फेकून दिली. तसेच दुकानाच्या गल्ल्यात जमा झालेली ७ हजार ३०० रुपयांची रक्कम जबरदस्तीने चोरुन फरार झाले. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. चिखली पोलीस अधिक तपास करत आहेत.