हे तर इन्कम टॅक्सच्या पुढचे निघाले; काळा पैसा दडवल्याचे समजून भरदिवसा टाकला दरोडा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 03:04 PM2023-01-20T15:04:21+5:302023-01-20T15:22:32+5:30
पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली
पिंपरी : घरात काळा पैसा दडवून ठेवला आहे, असे समजून भरदिवसा दरोडा टाकला. तळेगाव दाभाडे येथे १० जानेवारी रोजी दुपारी पावणेदोनच्या सुमारास हा प्रकार घडला. चोरट्यांनी २४ तोळे सोने, रोख रक्कम व इतर मौल्यवान ऐवज चोरी करून नेला होता. याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने ही कारवाई केली.
अमर हरिदास दहातोंडे (वय २०, रा. वडाळा, ता. नेवासा, जि. अहमदनगर, सध्या रा. चिंबळी फाटा, ता. खेड), अनिल गोरखनाथ मस्के (वय ३०, रा. चिंबळी फाटा, मुळ रा. पनवेल), राजू रविशंकर यादव (वय ४२, रा. तळेगाव दाभाडे, मुळ रा. उत्तरप्रदेश), सोपान अर्जुन ढवळे (वय २४, सध्या रा. तळेगाव दाभाडे, मुळ रा. शहारा, ता. लोणार, जि. बुलढाणा), प्रशांत राजू काकडे (वय ३०, रा. तळेगाव दाभाडे), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे येथे भर दुपारी आरोपींनी दरोडा टाकून ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणाचा तपास करीत असताना युनिट तीनच्या पथकाला आरोपींबाबत माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी सापळा रचून आरोपींना अटक केली. आरोपी राजू यादव व सोपान ढवळे यांना हॉटेल व्यवसाय करायचा असल्याने ते पैशांची जमवाजमव करीत होते. त्यावेळी तळेगाव परिसरात फिरत असताना त्यांना समजले की, तळेगाव दाभाडे येथील व्यापारी दिलीप चंपालाला मुथ्था हे पूर्वी गुटख्याचे व्यापारी होते. ते पूर्वी जेलमध्ये असल्याने त्यांच्या घरी भरपूर काळा पैसा दडवून ठेवलेला आहे, असे समजले. त्यानंतर आरोपींनी संगनमत करून हत्यारांची जमवाजमव करून मुथ्था यांच्या घरी भर दुपारी दरोडा टाकला. आरोपी अनिल मस्के व अमर दहातोंडे यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी पिंपरी- चिंचवड आयुक्तालय हददीतील चाकण, आळंदी, दिघी, भोसरी, भोसरी एमआयडीसी, चिखली, तळेगाव दाभाडे परिसरातील सोनसाखळी चोरीचे १२ गुन्हे केले असल्याचे पोलिसांना सांगितले. या आरोपींकडून या गुन्ह्यातील १९० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले.
युनिट तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, उपनिरीक्षक गिरीश चामले, पोलीस अंमलदार यदु आढारी, सचिन मोरे, ऋषिकेश भोसुरे, सागर जैनक, राजकुमार हनमंते, योगेश्वर कोळेकर, त्रिनयन बाळसराफ, राहुल सूर्यवंशी, सुधीर दांगट, महेश भालचिम, विठठल सानप, समीर काळे, निखील फापाळे, शशिकांत नांगरे, रामदास मेरगळ यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
२५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी जप्त करून, तसेच दोन पिस्तुले, २२ जिवंत काडतुसे, एक लाख रुपये रोख रक्कम, ४३० ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करून २५ लाख २७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.