निगडीत साडेसहा लाखाची चोरी; दहा तोळे दागिन्यांसह अडिच लाख लंपास, गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 02:40 PM2017-11-20T14:40:29+5:302017-11-20T14:46:37+5:30
चोरट्यांनी भरदिवसा घरातील साडेसहा लाखाचा ऐवज लंपास केला. त्यामध्ये दहा तोळे सोने आणि अडिच लाख रुपये रोख रकमेचा समावेश आहे. निगडी प्राधिकरण येथे ही घटना घडली.
निगडी : घराचा दरवाजा उघडा असल्याचे लक्षात घेवून चोरट्यांनी भरदिवसा घरातील साडेसहा लाखाचा ऐवज लंपास केला. त्यामध्ये दहा तोळे सोने आणि अडिच लाख रुपये रोख रकमेचा समावेश आहे. निगडी प्राधिकरण येथे ही घटना घडली. या प्रकरणी रविवारी फिर्याद दाखल झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजित सुभाष डागा (वय २३, रा. डागा रेसिडेन्सी, निगडी प्राधिकरण) यांनी चोरीप्रकरणी फिर्याद दिली आहे. ६ नोव्हेंबरला ही घटना घडली मात्र फिर्यादी काही कारणास्तव परदेश दौऱ्यावर गेले होते, त्यामुळे त्यांना फिर्याद दाखल करण्यास वेळ लागला. फिर्यादीचे बंधू मॉर्निंग वॉकला गेले होते. घरात महिला झोपली होती. आणखी एक जण दुसऱ्या खोलीत झोपले होते. चोरट्यांनी घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधली. सहज घरात प्रवेश करून त्यांनी कपाटातील १० तोळे दागिने आणि अडिच लाखाची रोकड काही अल्पावधित लंपास केली. कोणालाही चोरी झाल्याचा सुगावा लागला नाही. घराचा दरवाजा उघडा असल्याने कसलीही तोडफोड नाही, आवाज, गोंधळ नाही अशा वातावरणात चोरीचा प्रकार घडला. चोरट्यांनी मुद्देमाल घेवून कपाटाचा दरवाजा पुन्हा व्यवस्थित लावून तेथून पळ काढला. दागिने आणि रोकड असा एकूण ६ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे डागा कुटुंबीयांच्या लवकर लक्षात आले नाही.
कामानिमित्त त्यांनी कपाट उघडले, त्यावेळी कपाटातील दागिने आणि रोकड गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी केली. फिर्यादींनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे निगडी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर फिर्यादी काही कामानिमित्त परदेशात गेले होते, त्यामुळे फिर्याद दाखल होण्यास विलंब झाला, असे पोलिसांनी सांगितले.