रोल्स राॅयस माझ्या मालकीची; कोरटकरने फक्त फोटो काढला, बांधकाम व्यावसायिकाचा खुलासा
By नारायण बडगुजर | Updated: March 29, 2025 19:19 IST2025-03-29T19:19:13+5:302025-03-29T19:19:55+5:30
प्रशांत कोरटकर याच्या फोटोमधील रोल्स राॅयस गाडी माझी आहे, माझा आणि कोरटकरचा काहीही संबंध नाही

रोल्स राॅयस माझ्या मालकीची; कोरटकरने फक्त फोटो काढला, बांधकाम व्यावसायिकाचा खुलासा
पिंपरी : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक शब्द वापरल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर याची पोलीस कसून चौकशी करीत आहेत. कोरटकर याच्या एका फोटोमध्ये रोल्स रॉयस या आलिशान कारबद्दल चर्चा सुरू आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड येथील बांधकाम व्यावसायिक तुषार कलाटे यांच्या मालकीची ही कार आहे.
प्रशांत कोरटकर याचे फोटो असलेल्या आलिशान रोल्स रॉईस गाडीचा शोध सुरू होता. या रोल्स रॉयस कारसोबत तुषार कलाटे यांचेही फोटो आहेत. त्यामुळे कोरटकर आणि तुषार कलाटे यांचा नेमका काय संबंध आहे, याबाबत चर्चा सुरू झाली.
बांधकाम व्यावसायिक तुषार कलाटे यांनी याबाबत प्रसिद्धीपत्रकातून खुलासा केला आहे. कलाटे यांनी दिलेल्या पत्रकात नमूद आहे की, प्रशांत कोरटकर याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानाचा मी निषेध करतो. कोरटकरला कडक शिक्षा व्हावी, अशीच एक शिवप्रेमी म्हणून माझी इच्छा आहे. प्रशांत कोरटकर याचा फोटो असलेली रोल्स राॅयस गाडी माझ्या मालकीची आहे. या गाडीवर पूर्वी असलेले फायनान्स कंपनीचे कर्ज भरून आणि कायदेशीर प्रक्रियेचे पालन व कागदपत्रांची पूर्तता करून ही गाडी मी २०१७ मध्ये खरेदी केली. काही महिन्यांपूर्वी कोरटकर हा एका मित्राच्या माध्यमातून मला भेटला. त्यावेळी त्याने पत्रकार असल्याचे सांगून माझ्या रोल्स रॉयस गाडीसोबत फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली. पत्रकार असल्याने त्याला फोटो काढण्याची मी परवानगी दिली. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रशांत कोरटकर अवमानकारक बोलला. त्यानंतर हा फोटो व्हायरल झाला. प्रशांत कोरटकर आणि माझा कोणत्याही प्रकारे कुठलाही संबंध नाही. कोरटकर याच्याशी एकदाही फोनवर सुद्धा बोललेलो नाही.
कारची नोंदणी प्रक्रिया
रोल्स राॅयस कार ही महेश मोतेवार याच्या समृद्ध जीवन कंपनीच्या नावावर आहे. मोतेवार याचे आर्थिक घोटाळ्याचे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. या कारची नोंदणी माझ्या नावावर होण्यासाठी संबंधित बँक आणि फायनान्स कंपनीकडून प्रक्रिया करण्यात येत आहे, असे तुषार कलाटे यांनी सांगितले.
प्रशांत कोरटकर याच्या फोटोमधील रोल्स राॅयस गाडी माझी आहे. माझा आणि कोरटकरचा काहीही संबंध नाही. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कोरटकर अवमानकारक बोलला. त्याचा मी निषेध करतो. - तुषार कलाटे, बांधकाम व्यावसायिक, वाकड