शुक्रताऱ्यातील प्रेमळ हास्य लोपले : सुवर्णा माटेगावकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 03:11 AM2018-05-07T03:11:11+5:302018-05-07T03:11:11+5:30
पुण्यातील खडकमाळ आळी येथे अरुण दाते यांच्या शुक्रतारा या संगीत कार्यक्रमातून त्यांच्याबरोबरच्या स्नेहबंधाला सुरुवात झाली. १९९७ चा काळ असावा तो. त्यानंतर पुढे साधारण चार ते पाच वर्षे मला त्यांच्यासमवेत काम करण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य म्हणावे लागेल.
पुण्यातील खडकमाळ आळी येथे अरुण दाते यांच्या शुक्रतारा या संगीत कार्यक्रमातून त्यांच्याबरोबरच्या स्नेहबंधाला सुरुवात झाली. १९९७ चा काळ असावा तो. त्यानंतर पुढे साधारण चार ते पाच वर्षे मला त्यांच्यासमवेत काम करण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य म्हणावे लागेल. आम्ही सर्व जण त्यांना अरुभय्या या नावाने हाक मारायचो. मूळच्या इंदूरच्या असणाºया अरुभय्यांच्या वागण्यात एक रुबाब होता. आदब, आदर होता. लहान असो वा मोठे त्यांच्या बोलण्यातील मार्दव खूप लोभसवाणे होते. खासकरून नव्या सहकलाकारांना धीर देण्याचे काम ते मोठ्या खुबीने करायचे. याविषयीचा एक संस्मरणीय प्रसंग आठवतो. खडकमाळ आळीत मी पहिल्यांदाच त्यांच्या शुक्रतारा कार्यक्रमात सहभागी झाले. अरुभय्यांची गाण्यांची यादी तयार होती. कुठल्या वेळी कोणते गाणे गायचे, हे त्यांचे पक्के होते. माझ्या मनावर कमालीचे दडपण होते. कार्यक्रमाला प्रचंड गर्दी, जिथे जागा मिळेल अशा ठिकाणी रसिकांची दाटी पाहून मला भीती वाटली. मात्र प्रत्यक्षात कार्यक्रमाला सुरुवात झाल्यानंतर अरुभय्या यांनीच माझ्यात आत्मविश्वास भरला. ते श्रोत्यांना म्हणाले, की आजच्या कार्यक्रमाला माझ्या सहकारी नवीन आहेत. त्यानंतर तो कार्यक्रम सुंदर रंगला. रसिकांनी त्याला भरभरून दाद दिली.
जेव्हा केव्हा मुंबई अथवा इंदूरला जाणे व्हायचे त्या वेळी ते आवर्जून घरी बोलवायचे. खाऊपिऊ घालायचे. विशेषत: डाळ बाटी. त्यांच्या पत्नी मीनाताई यादेखील अतिशय प्रेमळ. अरुभय्यांच्याबाबतीत सांगायचे झाल्यास ते अतिशय न्रम स्वभावाचे होते.
कुठल्या अभिनेत्याकरिता पार्श्वगायन करून ते मोठे झाले नाहीत, तर त्यांच्या शुक्रतारा या कार्यक्रमांतील हृदयस्पर्शी भावगीतांमुळे ते आबालवृद्धांमध्ये कमालीचे लोकप्रिय होते. त्यांच्या स्वभावात दिलदारपणा होता. प्रचंड समजूतदारपणा, सहकाºयाला पाठिंबा देणे, यामुळे ते सगळ्यांना हवेहवेसे वाटायचे. त्यांच्याबरोबर मराठवाडा, विदर्भ, कोकण येथे दौरे करण्याचा योग आला. त्याप्रसंगी त्यांचे गाणे ऐकण्यासाठी रसिकांनी केलेली गर्दी पाहून अचंबा वाटायचा. ज्या काळात मोबाईल, इंटरनेट आणि टीव्हीचेदेखील फारसे प्रस्थ नव्हते, त्या काळात त्यांच्या मैफलीत रसिक दाटीवाटीने बसून ‘शुक्रतारा’ कार्यक्रमाचा आनंद घ्यायचे. अरुभय्या त्यांच्या यशाचे श्रेय हे नेहमी गीतकार आणि संगीतकारांना द्यायचे. कुठल्याही गोष्टीचे काहीही झाले
तरी श्रेय घ्यायचे नाही, असा त्यांची वृत्ती होती.
केतकी ज्या वेळी लहान होती. तेव्हा एकदा तिला घेऊन अरुभय्यांकडे गेले. तिला बघून हिला शास्त्रीय संगीत शिकव, असे ते म्हणाले होते. गायक कुठला का असेना, गाणं गाणाºया प्रत्येक गायकाने गाण्याचे शिक्षण घेतले पाहिजे. मगच गायनाला सुरुवात केली पाहिजे, असा अरुभय्यांचा आग्रह असायचा.