रहाटणीत रस्त्यांची झाली दैना, खड्डेच खड्डे : पावसामुळे पिंपळे सौदागर, काळेवाडी परिसरातील जनजीवन विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 03:36 AM2017-08-21T03:36:51+5:302017-08-21T03:37:06+5:30
शनिवारी मध्यरात्रीपासून सुरूअसलेल्या दमदार पावसामुळे रहाटणी, पिंपळे सौदागर, काळेवाडी, थेरगाव, वाकड, पिंपळे निलख व हिंजवडी परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले. सुटीचा दिवस असूनही पावसामुळे रस्त्यावर रहदारी नव्हती,तर हातगाडीवाले, फेरीवाले,पथारीवाले व छोटे व्यावसायिक व्यवसायावर मोठा परिणाम झाला.
रहाटणी : शनिवारी मध्यरात्रीपासून सुरूअसलेल्या दमदार पावसामुळे रहाटणी, पिंपळे सौदागर, काळेवाडी, थेरगाव, वाकड, पिंपळे निलख व हिंजवडी परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले. सुटीचा दिवस असूनही पावसामुळे रस्त्यावर रहदारी नव्हती,तर हातगाडीवाले, फेरीवाले,पथारीवाले व छोटे व्यावसायिक व्यवसायावर मोठा परिणाम झाला. अनेक दिवसांनी सुरू झालेल्या पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते, तर अनेक रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत होती.
अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर शहर व परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. शनिवारी सायंकाळी सुरू झालेल्या पावसाचा मध्यरात्री चांगलाच जोर वाढला तो रविवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत कायम होता त्यामुळे सुटी असूनही चाकरमान्यांना घराबाहेर पडता आले नाही . रहाटणी व पिंपळे सौदागर परिसरात दर रविवारी सुरु असणारा आठवडे बाजार पावसामुळे लागला नसल्याने नागरिकाना आठवड्याचा भाजीपाला खरेदी करता आला नाही. तसेच रविवारी चांगला व्यवसाय होईल म्हणून खरेदी केलेला छोट्या
व्यावसायिकांचा माल ग्राहकाविना पडून राहिला. अगदी सकाळपासून पावसाची संततधार सुरू असल्याने नागरिक घराबाहेर पडणे प्रामुख्याने पाळल्याचे
आढळून आले. सततच्या पावसामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात
गारवा होता. त्यामुळे आरोग्याला
बाधा होऊ नये म्हणून नागरिक घराबाहेर पडणे शक्यतो टाळल्याचे दिसून आले. काही रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने वाहनचालकाना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत होते. रहाटणी येथील गोडांबे चौक ते तापकीर मळा रस्त्यावर खड्डा पडल्याने अनेक वाहने या खड्ड्यांत अडकत होती. या ठिकाणी पाण्याचे व चिखलाचे साम्राज्य पसरल्याने खड्डा चुकविण्यासाठी वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत होती.
मागील काही दिवसांपूर्वी एका कामासाठी हा रस्ता खोदण्यात आला. मात्र हा खोदलेला रस्ता योग्य प्रकारे बुजविला नसल्याने पावसात त्यात पाणी साचून चिखलाचे साम्राज्य तयार झाले. काम संपताच हा खड्डा योग्य पद्धतीने बुजविला असता, तर पावसात वाहनचालकांना ही कसरत करावी लागली नसती. हा जीवघेणा खड्डा लवकरात लवकर बुजविण्याची मागणी स्थानिक नागरिक व वाहन चालक करीत आहेत.