रिंगरोडसाठी ३०० कोटींचा खर्च, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रस्ता आवश्यक असल्याने सत्ताधारी आग्रही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 01:12 AM2017-10-28T01:12:43+5:302017-10-28T01:12:52+5:30
पिंपरी-चिंचवड शहरातील रिंगरोड तयार करण्यासाठी सत्ताधारी आग्रही असून, एचसीएमटीआर विकसित करण्यासाठी महापालिकेला सुमारे ३०० कोटी रुपयांचा खर्च करावा लागणार आहे.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील रिंगरोड तयार करण्यासाठी सत्ताधारी आग्रही असून, एचसीएमटीआर विकसित करण्यासाठी महापालिकेला सुमारे ३०० कोटी रुपयांचा खर्च करावा लागणार आहे. त्यांपैकी रहाटणीतील कोकणे चौक ते काळेवाडी फाट्यापर्यंतच्या १५५० मीटर लांबी आणि ३० मीटर रुंंदीच्या रस्त्यासाठी २७ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. या कामाची निविदा नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे रिंगरोड होणार हे निश्चित झाले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका मंजूर विकास आराखड्यानुसार रहाटणी येथे कोकणे चौक ते काळेवाडी फाट्यापर्यंत ३० मीटर रुंद उच्चक्षमता द्रुतगती मार्गाचे आरक्षण आहे. साई चौकातील उड्डाणपुलाचे काम नवनगर विकास प्राधिकरणामार्फत सुरू आहे. ग्रेड सेपरेटरच्या कामाचे आदेश संबंधित ठेकेदारास दिले आहेत. साई चौकातील कामामुळे वाहतुकीच्या समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्या आहेत. वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी नवीन मार्ग उपयोगी पडणार आहे.
साई चौकातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी कोकणे चौक ते काळेवाडी फाटा या ३० मीटर उच्चक्षमता द्रुतगती मार्गाचे (एचएसएमटीआर) पर्यायी रस्ता म्हणून नियोजन केले आहे. उच्चक्षमता द्रुतगती मार्ग विकसित नसल्यामुळे वाहतूक करणे शक्य नाही. त्यामुळे भविष्यात उच्चक्षमता द्रुतगती मार्ग विकसित करायचा आहे. या मार्गावरील अतिक्रमण, अवैध बांधकामे काढून टाकण्यासाठी १६ जून २०१७ रोजी बीआरटीएस स्थापत्य विभाग, तसेच बांधकाम परवानगी आणि अवैध बांधकाम नियंत्रण विभागामार्फत सयुक्तिक कारवाई केली. त्यात ३० मीटर उच्चक्षमता द्रुतगती मार्ग मोकळा केला आहे. तसेच रहाटणीतील कोकणे चौक ते काळेवाडी फाट्यापर्यंत १५५० मीटर लांबीचा व ३० मीटर रुंदीच्या उच्चक्षमता द्रुतगती मार्गावर पुन्हा अतिक्रमण किंवा अवैध बांधकामे होऊ नयेत म्हणून या ३० मीटर रुंद उच्चक्षमता द्रुतगती मार्गाचा विकास करणे आवश्यक आहे.
या जागेची पाहणी करून सार्वजनिक बांधकाम विभागाने २०१७-१८ मध्ये, तसेच या कामाचे प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार संस्थेने अंदाजपत्रक तयार केले आहे. महापालिकेच्या २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात संपूर्ण रिंगरोड करण्याच्या कामास ३०० कोटी रुपये अर्थसंकल्पीय रकमेस मान्यता मिळाली आहे. रहाटणीतील कोकणे चौक ते काळेवाडी फाट्यापर्यंतच्या रस्त्यासाठी महापालिकेमार्फत निविदा प्रसिद्ध केली आहे.
>असा आहे रिंगरोड ?
१९९५च्या मंजूर विकास आराखड्यात उच्चक्षमता वाहतूक मार्ग वर्तुळाकार पद्धतीने रिंगरोड विकसित करण्याचे नियोजन आहे. महापालिका, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) आणि लष्कराच्या हद्दीतून हा रिंगरोड जातो.
रिंगरोडची एकूण लांबी ३० किलोमीटर असून, रुंदी ३० मीटर आहे. एमआयडीसी हद्दीतून पूर्व बाजूस १७.७८ किलोमीटर, तर पश्चिमेकडील भागातून ११.७३ किलोमीटर अंतरापर्यंत हा रिंगरोड आहे. पिंपरी महापालिका हद्दीतून पश्चिमेकडील कासारवाडी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, रहाटणी, थेरगाव, वाल्हेकरवाडी, आकुर्डी या गावांच्या हद्दीतून जातो.
पुढे नवनगर विकास हद्दीतून, तसेच पूर्वेकडील निगडी, स्पाईन रस्ता, नेहरुनगर, पिंपरी आणि कासारवाडी या वर्तुळाकार भागातून तो जातो. सद्य:स्थितीत महापालिका, नवनगर विकास प्राधिकरण, एमआयडीसी आणि लष्कर हद्दीतील अंदाजे ६५ टक्के जागा ताब्यात आहे. या रिंगरोडसाठी प्रकल्प सल्लागार नेमण्याची प्रक्रिया महापालिका स्तरावर सुरू आहे.
वाल्हेकरवाडी, थेरगावातील नागरिकांचे काय होणार?
रिंगरोडला थेरगाव, काळेवाडी, वाल्हेकरवाडी परिसरातून मोठा विरोध होत आहे. रिंगरोडमध्ये मोठ्या प्रमाणावर घरे असल्याने पर्यायी मार्गाचा विचार करावा, असे रिंगरोडबाधितांचे म्हणणे आहे. रिंगरोडविरोधी आंदोलनात भाजपाही नागरिकांच्या बाजूने आहे, असे दाखविते.
मात्र, दुसरीकडे या संदर्भातील प्रशासकीय कार्यवाही सुरू झालेली आहे. त्यातच प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्याने आता रिंगरोडबाधितांचे काय होणार? मुंढे यांना सत्ताधाºयांनी रिंगरोड करण्यासाठीच शहरात आणले आहे, अशी चर्चा आहे. रिंगरोडवरून सत्ताधारी भाजपाची कोंडी होणार आहे.