आरटीआय ससेमिऱ्याचा बळी? स्वामी समर्थ शाळेच्या संचालकांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 01:49 AM2018-08-13T01:49:17+5:302018-08-13T01:49:31+5:30
इंद्रायणीनगर येथील श्री स्वामी समर्थ शाळेतील हंगामी शिक्षक चांगदेव सखाराम बोराटे यांचे हदय विकाराने निधन झाले. शाळेकडे वारंवार माहिती अधिकारात अर्ज देऊन माहिती मागविण्यात येत होती.
पिंपरी - इंद्रायणीनगर येथील श्री स्वामी समर्थ शाळेतील हंगामी शिक्षक चांगदेव सखाराम बोराटे यांचे हदय विकाराने निधन झाले. शाळेकडे वारंवार माहिती अधिकारात अर्ज देऊन माहिती मागविण्यात येत होती. या ससेमिºयामुळे शिक्षकाचा मृत्यू झाला, असा अरोप करून या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. तसेच मृत्यू झालेल्या शिक्षकाला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली असल्याची माहिती स्वामी समर्थ विद्यालयाचे संचालक यशवंत बाबर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
स्वामी समर्थ विद्यालयात पूर्वी काही दिवस नोकरी केलेले अशोक रघुनाथ खर्चे सध्या या शाळेत नोकरीस नाहीत. मात्र ते वारंवार माहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहिती मागवित होते. माहिती देण्याची जबाबदारी बोराटे या शिक्षकावर होती. मात्र खर्चे व त्यांच्या साथीदारांनी माहिती अधिकारांतर्गत माहिती मागविण्याचा ससेमिरा लावल्याने मानसिक त्रास होऊन बोराटे यांचे हृदयविकाराने निधन झाले, असा संचालक बाबर यांनी आरोप केला आहे. इंद्रायणीनगर येथे असलेल्या भूखंडावर अतिक्रमण झाले आहे. एमआयडीसीकडे पत्रव्यवहार केला. त्यांनी नोटीस बजावल्यानंतरही अतिक्रमण निघालेले नाही. काही राजकीय व्यक्तींमुळे अतिक्रमण
झाले आहे, असेही मुद्दे बाबर यांनी उपस्थित केले.
आरोप बिनबुडाचे
माहिती अधिकारांतर्गत गेल्या अनेक वर्षांपासून माहिती मागवली जात आहे. मुख्याध्यापकांच्या नावे माहिती अधिकारात अर्ज केले आहेत. मृत्यू झालेल्या चांगदेव बोराटे या शिक्षकाशी आपला काहीच संबंध नाही. शिक्षकाला ओळखतही नाही. स्वामी समर्थ विद्यालयाचे संचालक बाबर यांनी केलेल्या आरोपात तथ्य नाही. आरोप बिनबुडाचे असून पोलिसांनी तपास केल्यास बोराटे या शिक्षकाचा मृत्यू कशामुळे झाला याचे कारण पुढे येईल. - अशोक खर्चे, माहिती अधिकार कार्यकर्ते