Pimpri Chinchwad: पिंपरी-चिंचवडमध्ये १४६ खासगी ट्रॅव्हल्स बसवर आरटीओची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 11:34 AM2023-07-07T11:34:19+5:302023-07-07T11:34:44+5:30
या बस चालकांवर आरटीओकडून कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून १२ लाख ६५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला...
पिंपरी : शहरात प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या ३६३ बसची तपासणी केली. यात १४६ बसचालकांनी मोटार वाहन कायद्यातील नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले आहे. या बस चालकांवर आरटीओकडून कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून १२ लाख ६५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
उन्हाळ्यात रेल्वे आणि एसटीचे बुकिंग फुल्ल असल्यामुळे नागरिक नाईलाजास्तव खासगी ट्रॅव्हल्सचा पर्याय निवडतात; पण खासगी ट्रॅव्हल्स चालक याच काळात मागणी जास्त असल्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणे, जादा भाडे आकारणी करणे अशा विविध नियमांचे उल्लंघन करतात. या पार्श्वभूमीवर परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी राज्यातील खासगी कंत्राटी प्रवासी बसची विशेष तपासणी मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते.
पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागामार्फत १६ मे ते ३० जून दरम्यान शहरातील विविध ठिकाणी विशेष तपासणी मोहीम राबविली होती. या मोहिमेमध्ये एकूण ३६३ प्रवासी बसची तपासणी केली. यात बस चालकांकडून विना परवाना अथवा परवान्याच्या अटींचा भंग करणे, प्रवासी बसमधून अवैधरित्या माल वाहतूक करणे, योग्यता प्रमाणपत्र नसणे, वाहनामध्ये बेकायदेशीर फेरबदल करणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणे, अवैधरित्या टप्पा वाहतूक करणे, कर न भरणे अशा विविध नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १४६ वाहनांवर आरटीओच्या दोन वायुवेग पथकामार्फत कारवाई केली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बसचालकांकडून १२ लाख ६५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
आरटीओच्या दोन वायुवेग पथकांमार्फत शहरातील विविध ठिकाणी खासगी ट्रॅव्हल्स बसची तपासणी करण्यात आली. यात १४६ वाहनांनी मोटार वाहन कायद्यातील नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
- अतुल आदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी चिंचवड आरटीओ