प्रवाशांच्या मदतीसाठी धावले कार्यकर्ते, चिंचवड स्थानकावर खोळंबल्या गाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 06:26 AM2017-08-31T06:26:04+5:302017-08-31T06:26:32+5:30
संततधार पावसामुळे मंगळवारी मुंबईतील जनजीवन ठप्प झाले. रुळावर पाणी साचल्याने विविध रेल्वे मार्गावरील रेल्वे तब्बल दहा तासांहून अधिक वेळ खोळंबल्या.
चिंचवड : संततधार पावसामुळे मंगळवारी मुंबईतील जनजीवन ठप्प झाले. रुळावर पाणी साचल्याने विविध रेल्वे मार्गावरील रेल्वे तब्बल दहा तासांहून अधिक वेळ खोळंबल्या. त्याचा विपरीत परिणाम मुंबईसह पुणे रेल्वेमार्गावरही जाणवला. मुंबईहून सुटलेल्या लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या
नियमित वेळपेक्षा कितीतरी अधिक वेळाच्या विलंबाने धावल्या. मंगळवारी रात्री आकुर्डी, तळेगाव आदी स्टेशनवर तासन्तास गाड्या उभ्या होत्या. चिंचवड रेल्वे स्थानकावर तर बुधवारी दुपारपर्यंत रेल्वे उभ्या असल्याचे दिसून आले. शहरातील कार्यर्त्यांनी धाव घेऊन प्रवाशांना चहा, नाष्टा दिला.
मुंबईतून सुटणाºया रेल्वे गाड्या मंगळवारी तब्बल दहा तास उशिरा धावल्या. मुंबईहून लोणावळा, तळेगाव, चिंचवड, पुणे मार्गे धावणा-या चेन्नई एक्स्प्रेस, कोईमतूर, विशाखापट्टनम, कोणार्क, कारायकल, कन्याकुमारी या एक्स्प्रेस गाड्या नियमित वेळेपेक्षा १० ते ११ तासांनी चिंचवडला पोहोचल्या. या एक्स्प्रेसने प्रवास करण्यास चिंचवड येथे आलेले अनेक प्रवासी प्रतीक्षा करून निघून गेले. तर मुंबईत रेल्वेत बसून निघालेले प्रवासी रात्री दहानंतर चिंचवडला आले. चिंचवडला आगोदरच काही गाड्या उभ्या होत्या. रेल्वे स्थानकाऐवजी आतील बाजूच्या रुळावर थांबलेल्या रेल्वेतील प्रवाशांची चिंचवडला गाडी थांबल्यानंतर धावाधाव झाली. कोणी पिण्याचे पाणी
आणण्यासाठी तर कोणी खाद्यपदार्थ कोठे मिळतील याची शोधाशोध करताना दिसून येत होते.
मुंबईपासूनच ठिकठिकाणी थांबत आलेल्या प्रवाशांची गैरसोय झाली. लांब पल्ल्याच्या गाड्या खोळंबल्याने स्थानिक रेल्वेगाड्यांचे वेळापत्रकही कोलमडले. लोणावळा ते पुणे आणि पुणे ते लोणावळा लोकलने प्रवास करणाºया प्रवाशांचेही हाल झाले.
प्रवाशांना पाहुणचार
लांब पल्ल्याच्या गाड्या उशिरा धावत असल्याने अनेक गाड्या चिंचवड स्टेशनवर थांबविण्यात आल्या होत्या. प्रवाशांचे होणारे हाल विचारात घेऊन नगरसेवक तुषार हिंगे, रेल्वे प्रवासी ग्रुप च्या हर्षा शहा, आमदार लक्ष्मण जगताप मित्र परिवाराचे सभासद, शहारातील विविध संस्थेचे कार्यकर्ते या प्रवाशांच्या मदतीला धावून आले. प्रवाशांना चहा, पाणी व बिस्किट पुड्यांचे वाटप करण्यात आले. गैरसोईने त्रस्त झालेले प्रवासी स्थानिक कार्यकर्त्यांच्या पाहुणचाराने सुखावले. त्यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले. प्रवाशांच्या सेवेसाठी विनोद जैन, दीपक चोपडा, राकेश नायर, पद्मनाथन शेट्टी, शिवराज चिखले, विशाल बाबर, गणेश भोसले यांनीही योगदान दिले.
चौघडा वादक रमेश पांचगे यांच्याकडून मदत
कामानिमित्त बुधवारी सकाळी प्रसिद्ध चौघडावादक रमेश पाचंगे लोणावळ्याला गेले होते. त्या ठिकाणी बराचवेळ थांबलेल्या रेल्वेगाडयांतील प्रवासी गैरसोईने त्रस्त झाले होते. पाणी आणण्यासाठी अथवा काही खाद्यपदार्थ घेऊन येण्यासाठी गाडीतून बाहेर पडावे तर अचानक गाडी सुरू होऊन आपली गाडी सुटू शकते. कुटुंबासह प्रवास करणारे प्रवासी लहान मुले, महिलांना सोडून जाऊ शकत नव्हते. अशा प्रवाशांना चौघडावादक पाचंगे यांनी स्वत: पाण्याच्या बाटल्या नेऊन दिल्या. लहान मुलांना खाऊवाटप केला. गैरसोईच्या संकटात सापडलेल्या प्रवाशांना मदत करता आली, याचे पाचंगे यांनी समाधान व्यक्त केले.