पिंपरीतील रुपीनगर परिसर आता कोरोना हॉटस्पॉट; आतापर्यंत आढळले ३४ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 08:38 PM2020-04-30T20:38:25+5:302020-04-30T20:38:39+5:30
दाट लोकवस्ती असलेल्या किंवा झोपडपट्टी परिसरात कोरोनाचा संसर्ग लागला वाढू
पिंपरी: पुण्याप्रमाणेच पिंपरी-चिंचवडमध्येही कोरोनाच्या सामूहिक संसगार्चा धोका वाढला आहे. रुपीनगर आणि ओटास्किम परिसरात सद्यस्थितीला आतापर्यंत ३४ रुग्ण आढळले आहेत. दाट लोकवस्ती असलेल्या किंवा झोपडपट्टी परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. एक-दोन महिन्यांत सुमारे २५ लाख लोकसंख्या गृहित धरून कोरोना प्रादुर्भाव रोखण्याची यंत्रणा पिंपरी-चिंचवड महापालिकेने उभी केली आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आणि भोसरीतील मनपा रुग्णालयामध्ये कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र, सर्वसाधारण आजारपणावर उपचार घेण्यासाठी खेड, जुन्नर, आंबेगाव, चाकण, देहूरोड, आळंदी आदी भागांतून नागरिक येत आहेत. त्यात पुन्हा कोरोनाच्या रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. अशा परिस्थितील आपत्ती व्यवस्थापनासाठी त्या-त्या महापालिका प्रशासनाने आपल्या हद्दीतील वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेऊन यंत्रणा उभी करण्याची अपेक्षा आहे. त्याप्रमाणे पुणे महापालिकने यंत्रणा उभी करण्याबाबत पिंपरी-चिंचवडला अवश्य मदत मागावी; पण उपचारासाठी रुग्ण पिंपरी-चिंचवडमध्ये पाठवणे योग्य होणार नाही.
पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने कोरोना रुग्णांबाबत सुमारे पाचशे रुग्णांची यंत्रणा उ केली आहे. सद्यस्थितीला शहरात ११० च्या घरात रुग्ण आहेत. आगामी दोन-तीन दिवसांत शहरातील रुग्णांचा आकडा दोनशेच्या वर जाऊ शकतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या निरीक्षणानुसार भारतातील सामूहिक संसर्ग कमी होण्यासाठी जुलै महिनाअखेर उजाडेल, असे सांगण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधित रुग्ण वाढल्यास त्याची काळजी कुठे घ्यायची, हा प्रश्न निर्माण होणार आहे.