Safe Driving Tips | न्यूट्रल वाहन चालवाल, तर जीवन होईल न्यूट्रल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 11:24 AM2022-11-24T11:24:49+5:302022-11-24T11:29:42+5:30
नियमाची भीती नव्हे स्वयंशिस्त गरजेची...
पिंपरी : पुण्यातील नवले पूल परिसरात एका ट्रकने ४८ गाड्यांना उडवले. अपघातात गाड्यांचे नुकसान झाले. एका जणाला जीव गमवावा लागला. या अपघातामागचे कारण स्पष्ट झाले असून, ट्रक चालकाने उताराला ट्रकचे इंजिन बंद केले. न्यूट्रलवर ट्रक चालवल्याने ब्रेक लागले नाही. त्यामुळे हा भीषण अपघात झाला. चालकांच्याच नव्हे, तर इतरांच्या जिवावर न्यूट्रलवर गाडी चालवणे बेतू शकते.
पेट्रोल, डिझेलची बचत म्हणून अनेक जण घाटाच्या उतारावर गाडी न्यूट्रल गीअरमध्ये टाकतात. मात्र, गाडी न्यूट्रल गीअरमध्ये असल्याने गाडीवर नियंत्रण राहत नाही. त्यामुळे अपघात होतो. घाटाच्या उताराला असे अपघात होण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे न्यूट्रलवर गाडी चालवण्याची जीवघेणी कसरत टाळा, असे आवाहन वाहतूक तज्ज्ञ करतात.
५०० रुपये दंड
न्यूट्रलवर गाडी चालवली म्हणून वाहतूक कायद्यात थेट कारवाईचे कोणतेही कलम नाही. मात्र, वाहतूक नियमांच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, तसेच १७७ कलमानुसार न्यूट्रलवर गाडी चालवणाऱ्यांवर वाहतूक पोलिस ५०० रुपये दंड आकारू शकतात. शिवाय न्यूट्रलवर गाडी चालवून अपघात होऊन कोणाचा मृत्यू झाला तर संबंधित चालकावर पोलिस सदोष मनुष्यवधाचा गुन्हादेखील दाखल करू शकतात.
नियमाची भीती नव्हे स्वयंशिस्त गरजेची
वाहन चालकांची मानसिकता ही दंड नको म्हणून नियम पाळू, या स्वरुपाची असते. मात्र, त्यांना हे माहिती हवे की जर नियम पाळले नाहीत तर अपघात होऊन आपला जीवदेखील जाऊ शकतो. त्यामुळे दंडाच्या भीतीने नव्हे तर स्वयंशिस्तीने नियम पाळणे गरजेचे आहे. स्वयंशिस्त पाळली तर अनेक मोठे अपघात टाळता येऊ शकतात.
न्यूट्रल गाडीचा असा होतो अपघात
उतारावर गाडी न्यूट्रल करून गाडी चालवल्याने इंधन बचत होईल, असे अनेक वाहन चालकांना वाटते. मात्र, प्रत्यक्षात न्यूट्रलवर गाडीच्या इंजिनला ऑइल पुरवठा बंद होतो. त्यामुळे गीअरबॉक्सचे नुकसान होते. याशिवाय वाहन चालकाचे गाडीवर नियंत्रण राहत नाही. ब्रेकसुद्धा फेल होतात. त्यामुळे अपघात होऊन थेट मृत्यूलाच आमंत्रण मिळेल.
उतारावर न्यूट्रलवर गाडी चालवणे हे धोकादायक आहे. त्यामुळे ब्रेक न लागता वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात होऊ शकतो. त्यामुळे वाहन चालकांनी न्यूट्रलवर वाहन चालवू नये.
- अतुल आदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड