पिंपरी-चिंचवडमध्ये भगवं वादळ! अंतर १५ किलोमीटर, पदयात्रा आठ तास
By विश्वास मोरे | Published: January 25, 2024 07:00 PM2024-01-25T19:00:58+5:302024-01-25T19:02:00+5:30
ठिकठिकाणी होणाऱ्या स्वागतामुळे शहरातील १५ किलोमीटर अंतरासाठी आठ तासांचा कालावधी लागला.....
पिंपरी : लाखो मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीतून निघालेली मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांची पदयात्रा पिंपरी-चिंचवड शहरात धडकली. फटाक्याची आतषबाजी, भगव्या पताका फडकावित पहाटे पावणेसहाच्या सुमारास भक्ती-शक्ती चौक निगडीतून पुढे मार्गस्थ झाली. मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी रात्र जागून काढली. मराठा समाजाचा प्रचंड उत्साह दिसून आला. तर ठिकठिकाणी होणाऱ्या स्वागतामुळे शहरातील १५ किलोमीटर अंतरासाठी आठ तासांचा कालावधी लागला.
पुण्यातील औंधमधून मुळा नदी ओलांडल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरात रात्री ९:३७ वाजता पदयात्रा पोहोचली. सांगवी फाट्यावर सभा झाली. त्यानंतर रक्षक सोसायटी चौक, पिंपळे निलख फाटा चौक, जगताप डेअरी चौक, काळेवाडी फाटा पूल, गुजरनगर, डांगे चौक, बिर्ला हॉस्पिटल चौक, वाल्हेकरवाडी जकातनाका, चापेकर चौक, कामिनी हॉटेल चौक, चिंचवड स्टेशन चौक, महावीर चौक, काळभोरनगर, खंडोबा माळ, बजाज ऑटो, टिळक आणि भक्ती-शक्ती पूल चौकात स्वागत कक्ष उभारले होते. पदयात्रेत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी भगव्या टोप्या, भगवे नेहरू शर्ट परिधान केले होते. दुचाकी, चारचाकीवर भगव्या पताका लावल्या होत्या. चारचाकी वाहनावर जरांगे-पाटील यांची छायाचित्रे झळकत होती. टोप्यांवर ‘एक मराठा लाख मराठा’, ‘जागा हो मराठा’, ‘मराठ्यांच्या न्याय्य हक्कासाठी...’ अशी घोषवाक्ये होती. सर्वच चौकात फुलांचे भलेमोठे हार घालण्यासाठी जेसीबी सज्ज होते. पाणी, केळी, बिस्किटे, वेफर्सचे वाटप केले जात होते.
रात्रभर उत्साह
चौकाचौकात ध्वनिवर्धक आणि ढोल-ताशांचा गजर सुरू होता. पदयात्रा जशी जवळ येऊ लागली, तशी मार्गावरील गर्दी वाढली. शिवछत्रपतींच्या शूरतेची महती सांगणारी गीते, पोवाडे सुरू होते. त्यावर मराठा बांधवांनी ताल धरला होता तर विविध सेवाभावी संघटना सेवा देत होते.
रात्रभर मराठा समाजाने जागून काढली
मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी, मराठा आरक्षण मिळवण्यासाठी जरांगे-पाटील यांनी काढलेल्या मुंबई पदयात्रेस पिंपरी-चिंचवड शहरात अलोट गर्दीने प्रतिसाद दिला. रात्रभर पदयात्रा मार्गावर गर्दी झाली होती. भक्ती- शक्ती चौकामध्ये पदयात्रा गुरुवारी सकाळी पावणेसहाच्या सुमारास पोहोचली.
कोण आला रे कोण आला, मराठ्यांचा वाघ आला..., जय भवानी जय शिवाजी... एक मराठा लाख मराठा... अशा घोषणा देण्यात आल्या आणि जरांगे-पाटलांचे आगमन झाले. जोरदार फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. पदयात्रा पाहण्यासाठी शहरातील नागरिकांनी रात्र जागून काढली.
आणि वेग वाढविला
चिंचवड स्टेशनला आल्यानंतर पदयात्रेचा वेग वाढविण्यात आला. महामार्गावर आल्यानंतर यात्रेने वेग घेतला. मनोज जरांगे-पाटील यांची पदयात्रा भक्ती-शक्ती चौकाकडून देहूरोडच्या दिशेने निघाली आहे. भक्ती-शक्ती चौकाजवळ उभारलेल्या मंडपाजवळ अलोट गर्दी झाली होती. काही क्षण थांबत मराठा बांधवांना हात उंचावत जरांगे पाटील यांनी अभिवादन केले. सभा न करताच पदयात्रेच्या पुढील मार्गावर मार्गस्थ झाले. पदयात्रेला उशीर झाल्याने भक्ती-शक्ती चौकातील सभा न होताच जरांगे-पाटील लोणावळ्याकडे मार्गस्थ झाले.
कडाक्याची थंडी तरी उत्साह कायम
कडाक्याची थंडी असतानाही मराठा समाजाचा किंवा पदयात्रेतील उत्साह कमी झालेला नव्हता. पुणे-मुंबई महामार्गावर पिंपरी-चिंचवड शहराच्या परिसरामध्ये ठिकठिकाणी स्वागत कक्ष उभारण्यात आले होते. निगडी भक्ती-शक्ती चौकातून देहूरोडकडे पदयात्रा मार्गस्थ झाल्यानंतर काही क्षणांमध्येच चौकातील वाहतूक सुरळीत करण्यात आली. वाहतूक नियोजनासाठी पोलिसांनी योगदान दिले तसेच मराठा समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी स्वयंसेवक म्हणून महामार्गावरील वाहतूक वळवण्यासाठी मदत करत होते.
शहरात प्रवेश : रात्री ९:३७
जगताप डेअरी चौक- रात्री १२:३७
काळेवाडी फाटा चौक - पहाटे १:३०
डांगे चौक-पहाटे ३.३५
चापेकर चौक - पहाटे ४:३७
चिंचवड स्टेशन -पहाटे ५:२०
आकुर्डी - पहाटे ५:२५
भक्ती-शक्ती चौक निगडी - पहाटे ५:४५