पुण्यामध्ये सक्ती असल्याने पिंपरी-चिंचवडमध्ये निकृष्ट दर्जाच्या हेल्मेटची विक्री
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2019 01:35 AM2019-02-09T01:35:23+5:302019-02-09T02:12:24+5:30
पुणे शहरामध्ये एक महिन्यापासून हेल्मेटसक्ती करण्यात आली आहे. त्याचा परिणाम पिंपरी-चिंचवड शहरातही जाणवू लागला आहे. कामानिमित्त शहरातून पुण्यामध्ये जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.
पिंपरी : पुणे शहरामध्ये एक महिन्यापासून हेल्मेटसक्ती करण्यात आली आहे. त्याचा परिणाम पिंपरी-चिंचवड शहरातही जाणवू लागला आहे. कामानिमित्त शहरातून पुण्यामध्ये जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांची हेल्मेटला मागणी वाढली आहे. मात्र यामुळे रस्त्यावर खुलेआम निकृष्ट दर्जाचे हेल्मेट विकण्याचे प्रमाणही वाढले आहे.
पुणे शहरामध्ये हेल्मेट न वापरणाºया दुचाकीचालकांवर दंडात्मक कारवाई सुरू आहे. त्याची धास्ती पिंपरी-चिंचवड शहरातील दुचाकीचालकांनीही घेतली आहे. दंडात्मक कारवाईच्या धास्तीने चालक निकृष्ट हेल्मेटची खरेदी करताना दिसत आहे. विक्रेतेही निकृष्ट दर्जाचे हेल्मेट ग्राहकांच्या माथी मारत आहेत. दुचाकीस्वाराचा अपघात झाला, तर निकृष्ट दर्जाच्या हेल्मेटमुळे गंभीर स्वरूपाची इजा होऊ शकते.
हे हेल्मेटविक्रेते कोणतेही बिल किंवा वॉरंटी कार्ड ग्राहकाला देत नाहीत. त्यामुळे अल्पावधीत हेल्मेट तुटल्यास ग्राहकाचा नाईलाज होतो. मोटार वाहन कायद्यातील कलम १२९ मध्ये हेल्मेटबाबत स्पष्ट तरतूद आहे. त्यानुसार, दुचाकी चालविणाºयाने व दुचाकीवर प्रवास करणाºयाने ‘आयएसआय’ प्रमाणित हेल्मेट घालणे सक्तीचे आहे. परंतु, या तरतुदीचे पालन होत नसल्याचे दिसत आहे. शहरात अप्रमाणित हेल्मेटची सर्रास विक्री केली जात असून, पूर्ण सुरक्षितता असणाºया हेल्मेटकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
कारवाईच्या भीतीपोटी हेल्मेटची खरेदी
हेल्मेट खरेदी करताना वाहनचालक केवळ वाहतूक पोलिसांची भीती बाळगून कारवाईपासून वाचण्यासाठी हेल्मेट खरेदी करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रस्त्याच्या कडेला थाटलेल्या ‘आयएसआय’ मार्कच्या बनावट हेल्मेटच्या दुकानावर ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे रस्त्यावर हेल्मेट विक्रेत्यांची चांदी होत आहे. मात्र हेच निकृष्ट दर्जाचे हेल्मेट वाहनचालकांच्या जिवावर बेतण्याची शक्यता आहे. वाहनचालकांच्या जिवाशी खेळणारा हेल्मेट व्यवसाय जोरात सुरू असतानाही पोलीस प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
१५० ते २०० रुपयांत निकृष्ट हेल्मेट मारताहेत माथी
रस्त्यांवर किंवा काही दुकानांमध्ये विकण्यात येत असलेल्या हेल्मेटवरील आयएसआय मार्कही बनावट आहे. चांगल्या दर्जाच्या हेल्मेटची किंमत ७०० ते ८०० रुपयांपासून सुरू होते. मात्र निकृष्ट दर्जाचे हेल्मेट केवळ १५० ते २०० रुपयांत मिळत आहेत. त्यामुळे केवळ पुण्याला जाण्यासाठी या हेल्मेटची खरेदी होत आहे. ही हेल्मेट हलकी आहेत. ती खाली पडली की तुटत आहेत, तरीही वाहनचालक अशा प्रकराची हेल्मेट घेत आहेत. याबद्दल उलगडा होत नाही, असे सूज्ञ नागरिकांनी सांगितले.