वुमेन वाॅरियर्सला सॅल्यूट! बाळाला जन्म देईपर्यंत महिला पोलीस ‘ऑन ड्यूटी’
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 10:30 AM2021-06-04T10:30:47+5:302021-06-04T10:30:55+5:30
गोंडस बाळाला जन्म देणाऱ्या त्या महिला पोलिसाचे सर्वत्र कौतुक
नारायण बडगुजर
पिंपरी: लहान मुले, जेष्ठ नागरिक तसेच गरोदर महिलांना कोरोना विषाणूंचा संसर्ग होण्याचा धोका असल्याचे सांगितले जाते. असे असतानाही महिलापोलिसाने बाळंत होईपर्यंत कर्तव्य बजावले. एका गोंडस बाळाला जन्म देणाऱ्या त्या महिला पोलिसाचे कौतुक होत आहे.
वैष्णवी विजय गावडे, असे त्या कर्तव्य तत्पर महिला पोलिसाचे नाव आहे. सामान्य कुटुंबाची पार्श्वभूमी असलेल्या वैष्णवी या कबड्डीपटू असून राज्य तसेच राष्ट्रीयस्तरीय स्पर्धांमध्ये त्या खेळल्या आहेत. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकात त्या प्रतिनियुक्तीवर आहेत. वैष्णवी २००७ मध्ये पोलीस दलात भरती झाल्या. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी कार्यान्वित केलेल्या सामाजिक सुरक्षा पथकात प्रतिनियुक्ती होणाऱ्या त्या पहिल्या महिला पोलीस कर्मचारी आहेत.
वैष्णवी यांचा २०१५ मध्ये विवाह झाला. त्यांचे पती हिंजवडी येथील एका खासगी कंपनीत नोकरीला आहेत. त्यांना पाच वर्षांची मुलगी आहे. पती व मुलगीसह त्या रहाटणी येथे रहायला आहेत. सामाजिक सुरक्षा पथकात कार्यरत असताना त्यांना विविध कारवायांमध्ये सहभागी असल्याने रात्री उशिरापर्यंत काम करावे लागते. नेहमीप्रमाणे त्या बुधवारी (दि. २) ऑन ड्यूटी असताना चिंचवड येथे एका चारचाकी वाहनातून दारू वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सामाजिक सुरक्षा पथकाने चिंचवड येथे सापळा रचून वाहन पकडून मद्यसाठा जप्त केला. या कारवाईत गावडे या देखील सक्रिय सहभागी होत्या.
कारवाईत पकडलेला मुद्देमाल व आरोपींना चिंचवड पोलीस ठाण्यात नेण्यात आले व गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू झाले. त्यावेळी दुपारी साडेचारच्या सुमारास वैष्णवी यांना त्रास जाणवला. त्यामुळे तातडीने त्या चिंचवड पोलीस ठाण्यातून थेट चापेकर चौकातील एका खासगी रुग्णालयात गेल्या. तेथे त्यांना दाखल करून घेण्यात आले. दरम्यान त्यांनी पतीला याबाबत फोन करून माहिती दिली होती. सायंकाळी साडेसातच्या सुमारास त्यांनी मुलाला जन्म दिला.
"सामाजिक सुरक्षा पथकाचे वरिष्ठ निरीक्षक विठ्ठल कुबडे, उपनिरीक्षक धैर्यशिल सोळंके, प्रदीपसिंग सिसोदे, प्रणिल चौगले यांनी सातत्याने मनोबल उंचावले. त्यामुळे कामाचा ताणतणाव आला नाही. महामारीत प्रत्येकाने ड्यूटी करून आपले योगदान दिले पाहिजे. खिलाडूवृत्ती असल्यास उत्साह टिकून राहतो. असे गावडे यांनी सांगितले".