महिला पोलिसांच्या कार्याला सलाम! लेकरांना घरी ठेवून रात्री उशिरापर्यंत बजावतात कर्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 05:45 PM2021-06-03T17:45:45+5:302021-06-03T17:45:53+5:30
कोरोना संकट लवकर दूर होऊ दे, परिस्थिती पूर्वपदावर येऊ दे, अशी अपेक्षा
नारायण बडगुजर
पिंपरी: कोरोना काळात लाॅकडाऊन व निर्बंधांच्या अंमलबजावणीसाठी महिलापोलिसांनाही रस्त्यावर उतरावे लागले आहे. चेकपोस्ट, नाकाबंदी तसेच गस्तीसाठी कर्तव्य बजवावे लागत आहे. लेकरांना घरी ठेवून रात्री उशिरापर्यंत या ‘वुमेन वॉरियर्स’ला ड्युटी करावी लागत आहे. कुटुंबाला पुरेसा वेळ देता येत नाही, लेकरांना जवळ घेता येत नाही, त्यामुळे हे संकट लवकर दूर होऊ दे, परिस्थिती पूर्वपदावर येऊ दे, अशी अपेक्षा या महिलापोलिसांकडून व्यक्त होत आहे.
पिंपरी -चिंचवड पोलीस आयुक्तालय नवे असल्याने मनुष्यबळाची कमतरता आहे. उपलब्ध मनुष्यबळाचा पुरेपूर वापर करून घेण्यात येत आहे. त्यात तुलनेने कमी संख्या असूनही महिला पोलिसांना बारा तासांपेक्षा जास्त काम करावे लागत आहे. परिणामी त्यांची मुले, कुटुंबातील इतर सदस्य तसेच नातेवाईकांनाही वेळ देणे सहज शक्य होत नाही. तसेच छोट्या कुटुंबातील त्यांची मोठी कसरत होत आहे. मुलांना सांभाळायला कोणी नसल्याने त्यांची घालमेल सुरू असते. त्यामुळे काहींनी मुलांना गावाकडे तसेच आजोळी पाठवले आहे. मात्र तरी देखील मुलांची काळजी लागून असते. तसेच घरच्यांकडून या महिला पोलिसांची सातत्याने चौकशी केली जाते.
कुटुंबाची काळजी मोबाईलवरूनच
शहर पोलीस दलातील महिला पोलिसांची मुले बाल्यावस्थेत तसेच विद्यार्थीदशेत आहेत. शहरातील काही महिला पोलिसांना कोविड सेंटर किंवा रुग्णालयामध्ये ड्युटी करावी लागते. त्यामुळे त्यांना स्वत:ला विलगीकरणात रहावे लागते. अशावेळी मुलांना भेटता येत नाही. त्यांना जवळ घेता येत नाही. तसेच नातेवाईकांकडे जाता येत नाही. अशावेळी कुटुंबातील प्रत्येकाची काळजी घेण्यासाठी मोबाईलवरूनच विचारपूस केली जाते. प्रत्यक्षात भेट होत नसल्याने व्हिडीओ कॉल करून भेट झाल्याचे समाधान त्यांना मानावे लागते.
पोलीस शिपाई उज्वला पाटील म्हणाल्या, अनुकंपा तत्वावर मी पोलीस दलात दाखल झाले. मुली घरी एकट्याच असतात. फोनवरूनच त्यांना समजूत घालावी लागते. महिलांशी संबंधित प्रकरणे असल्यास त्यासाठी पूर्ण वेळ द्यावाच लागतो. अशावेळी मुलींचा फोन घेता येत नाही. नाकांबंदी, बंदोबस्त असल्यास रात्री उशिरापर्यंत ड्यूटी करावी लागते.
"ड्यूटी करून रात्री उशिरा घरी गेल्यानंतर अंघोळ करावी लागते. त्यानंतर जेवण करून मुलांना किमान अर्धातास द्यावा लागतो. रात्री दहानंतर मुलींचा फोन किंवा व्हिडीओ काॅल येतो. मम्मी केव्हा येणार तू, अशी विचारणा करतात. नातेवाईकही मोबाइलवरून काळजी घ्या, असे आस्थेवाईकपणे सांगतात. असे सांगवीच्या पोलीस उपनिरीक्षक कविता रुपनर यांनी सांगितले आहे".
महिलांशी संबंधित प्रकरणे संवेदनशील असतात. त्याचे कामकाज ठराविक वेळेत पूर्ण करावे लागते. त्यात मोठा वेळ जातो. यात रात्री उशिर होतो. अशावेळी सासू व मुलीचा फोन येतो. नातेवाइकांचीही मोबाइलवरून चौकशी करावी लागते. ते सर्व जण समजून घेतात. महिला पोलिसांनाही ‘ड्यूटी’ महत्त्वाचीच आहे.
नीता उबाळे, सहायक पोलीस निरीक्षक, चिंचवड