मराठा समाजासाठी ओबीसी घटकातूनच आरक्षण द्यावे- संभाजी ब्रिगेड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 01:06 AM2018-12-04T01:06:06+5:302018-12-04T01:06:18+5:30
मराठा समाजासाठी मंजूर केलेले १६ टक्के आरक्षणाचे विधेयक संवैधानिक नसून फसवे आहे.
पिंपरी : मराठा समाजासाठी मंजूर केलेले १६ टक्के आरक्षणाचे विधेयक संवैधानिक नसून फसवे आहे. त्यामुळे मराठा समाजाचा ओबीसीमध्येच समावेश करण्यात यावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केली आहे.
पवार यांनी नमूद केले आहे की, मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण म्हणून जे विधेयक विधिमंडळात सर्वानुमते मंजूर करून घेतलेले आहे ते कायद्याच्या चौकटीमध्ये बसणारे नसून घटनाबाह्य आहे. हे सरकारला माहिती असूनही कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण दिलेले आहे असे दाखवून मराठा समाजाची दिशाभूल केली जात आहे. मराठा समाजाने आरक्षण आणि इतर १९ मागण्यांसाठी अभूतपूर्व आणि शिस्तबद्ध असे ५८ मोर्चे काढलेले आहेत.
४२ पेक्षा अधिक तरुणांनी बलिदान दिले आहे. राज्य मागासवर्ग आयोगाने आरक्षण देण्यासाठी आजपर्यंत कोणत्याही जातीचा केलेला नाही एवढा मोठा सर्वे मराठा समाजाचा केला आहे. मराठा समाजाची सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक क्षेत्रात झालेली दयनीय परिस्थिती अहवालात दिलेली आहे. त्या अहवालानुसार मराठा समाज ओब्उाीसीमध्ये समाविष्ट करण्यासाठी पात्र ठरलेला असतानादेखील जाणीवपूर्वक मराठा समाजाला सुप्रीम कोर्टाने ठरवून दिलेल्या मर्यादेबाहेर बेकायदा आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे.
राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालानुसार मराठा समाजाने ओबीसीमध्ये समाविष्ट होण्यासाठीचे सर्व निकष पूर्ण केलेले आहेत. ते संवैधानिक मान्यता असलेले आरक्षण असल्यामुळे राज्य सरकारने राज्याची प्रक्रिया पूर्ण करून तत्काळ केंद्र सरकारकडे मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्यासाठी शिफारस करावी, अशी मागणी पवार यांनी केली आहे.