अकरा कोटींच्या प्रस्तावांना ऐनवेळी मंजुरी
By admin | Published: January 12, 2017 02:55 AM2017-01-12T02:55:25+5:302017-01-12T02:55:25+5:30
स्थायी समितीच्या अखेरच्या सभेत पर्यावरण अभियांत्रिकी विभागाने मैलाशुद्धीकरण केंद्राचे संचलन, देखभाल-दुरुस्ती
पिंपरी : स्थायी समितीच्या अखेरच्या सभेत पर्यावरण अभियांत्रिकी विभागाने मैलाशुद्धीकरण केंद्राचे संचलन, देखभाल-दुरुस्ती कामाचे ११ कोटींचे प्रस्ताव आयत्या वेळी सादर करत मंजूर करवून घेतले. महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता असताना स्थायी समितीची अखेरची सप्ताह सभा झाली. विषयपत्रिकेवर १२ कोटींंचे प्रस्ताव होते. त्या वेळी पर्यावरण विभागच स्थायी समितीच्या मदतीला धावून आला.
महापालिकेची १३ मैलाशुद्धीकरण केंद्र आहेत. त्यांची देखभाल-दुरुस्ती, संचलन ठेकेदारांमार्फत होते. पर्यावरण विभाग निविदा काढण्याचे सोपस्कार पूर्ण करते. अधिकारी, पदाधिकारी आणि ठेकेदारांची रिंगकायम आहे. आजच्या सभेत चिंचवड मैलाशुद्धीकरण केंद्र्र (२ कोटी), भाटनगर मैलाशुद्धीकरण केंद्र (२ कोटी) आणि चिखली मैलाशुद्धीकरण केंद्र (५ कोटी) ठेकेदाराला चालविण्याचे आयत्या वेळचे प्रस्ताव सादर केले. कोणतीही चर्चा न करता १० कोटी ७७ लाख रुपयांच्या या कामाला मंजुरी दिली.
जिजामाता हॉस्पिटल प्रभागातील सुभाषनगर येथे मैलाशुद्धीकरण केंद्र बांधण्यासाठी येणाऱ्या ५७ लाखांच्या आणि वैभवनगर येथे बांधण्यात येणाऱ्या ४७ लाख रुपयांच्या वाढीव खर्चासही मान्यता दिली. या वेळी १८ कोटी रुपयांच्या आयत्या वेळच्या प्रस्तावांना मूक संमती दिली. त्यात रक्षक चौक ते भैरवनाथ मंदिर रस्त्याची सुधारणा करणे (५ कोटी १९ लाख) पिंपळे गुरव येथे खेळाचे मैदान विकसित करणे (३ कोटी ६० लाख) पिंपळे - गुरव येथील प्राथमिक शाळेचे विस्तारीकरण करणे (५ कोटी ३८ लाख) राजर्षी शाहू पुतळ्याजवळ शाहू सृष्टी उभारणे (१ कोटी ८६ लाख) आदी कामांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
बीआरटी मार्गात अंडरपास उभारणार
४वाढीव - सुधारित खर्चाला मान्यता देण्याचा प्रयत्न सुरूच आहे. औंध - रावेत बीआरटी रस्त्यावर वाय जंक्शन येथे अंडरपास बांधला जाणार आहे. या कामासाठी ११ कोटी १७ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. मात्र, त्यात ५ कोटी ८३ लाखांची वाढ करून तो १७ कोटींवर नेण्याची किमया झाली. त्याचप्रमाणे ड प्रभाग कार्यक्षेत्रात विविध कंपन्यांनी सेवावाहिनी टाकण्यासाठी रस्ते खोदले आहेत.