सनई-चौघडा, बेंजोला सुगीचे दिवस, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार डीजेला कायदेशीर बंदी असल्याचा परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 03:18 AM2018-03-08T03:18:47+5:302018-03-08T03:18:47+5:30
लग्नसराई जोरात सुरू असल्याने थेरगावमधील मंगल कार्यालयाच्या आवारात बेंजो आणि सनई- चौघड्यांचे आवाज कानी पडू लागले आहेत. डीजेला कायदेशीर बंदी आहे. त्यामुळे बेंजोला पसंती देण्यात येत आहे. सनईसारख्या पारंपरिक वाद्यांनाही यामुळे ‘अच्छे दिन’ आले आहेत.
थेरगाव - सध्या लग्नसराई जोरात सुरू असल्याने थेरगावमधील मंगल कार्यालयाच्या आवारात बेंजो आणि सनई- चौघड्यांचे आवाज कानी पडू लागले आहेत. डीजेला कायदेशीर बंदी आहे. त्यामुळे बेंजोला पसंती देण्यात येत आहे. सनईसारख्या पारंपरिक वाद्यांनाही यामुळे ‘अच्छे दिन’ आले आहेत.
वरात आणि पारणे मंगलकार्यात महत्त्वाचे मानले जातात. वरात आणि मिरवणुकीसाठी सनई आणि बेंजो पार्टी सांगण्यात येते. ढोल, ताशा, पिपाणी, हलगीच्या तालावर वºहाडी ठेका धरत आहेत. डीजेमुळे सनई-चौघडा आदी पारंपरिक वाद्य लुप्त होण्याची शंका व्यक्त करण्यात येत होती; मात्र न्यायालयाने डीजेवर बंदी घातली. त्यामुळे पारंपरिक वाद्यांना पुन्हा पसंती देण्यात येत आहे.
लग्नकार्याची आता लग्नसोहळे झाले आहेत. ‘इव्हेंट’चे स्वरूप प्राप्त झाल्याने या सोहळ्यांतील झगमगाट आणि खर्च भरमसाठ वाढला. घराच्या अंगणात होणारे हे ‘कार्य’ कधी मंगलकार्यालयात जाऊन पोहोचली, हे कोणाच्याही लक्षात आले नाही. हळद, आहेर, मानपान, रुखवत, वरओवाळणी या बाबी हळूहळू कमी होत आहेत. हळदीचा कार्यक्रम, साखरपुडा आणि लग्न एका दिवसात संपन्न होते. त्यामुळे पूर्णत: ‘इव्हेंट’चे स्वरूप या कार्यांना मिळाले आहे.
डीजेच्या गोंगाटात सनईचा मधुर स्वर हरवला होता. ‘पॉप’च्या नादात आणि मद्याच्या धुंदीत पारंपरिक वाद्य या अशा मंगल सोहळ्यांतून दुर्लक्षित होत होती. हृदय हलवून सोडणाºया या डीजेच्या भिंतींनी हृदयाचे ठोके कधी वाढवले हे कोणालाही कळले नाही. परिणामी कानठळ्या बसवणाºया या डीजेच्या भीतीने अनेकांच्या हृदयाचा ठोका चुकविला. अखेरीस न्यायालयाने या डीजेवर बंदी घातली.
डीजेच्या भीतीसमोर पारंपरिक वाद्यांचा टिकाव लागणे शक्य नव्हते. तरीही अनेक बेंजो पार्टीचालक आणि मालकांनी तग धरण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी आधुनिक वाद्य सामग्री खरेदी केली. कुशल वादक आपल्या पार्टीत सहभागी करून घेतले. सजावट केलेली स्वत:ची वाहने तयार करून घेतली. असे असतानाही डीजेच्या गोंधळात बेंजो पार्टीतील बदलाचा हा आवाज समाजमनापर्यंत पोहोचू शकला नाही.
बेंजो पार्टी कम आॅर्केस्ट्रा
बेंजो पार्टी व्यावसायिकांना सध्या आॅर्केस्ट्राही चालवावा लागत आहे. यात आधुनिक वाद्य सामग्रीसह महिला आणि पुरुष गायकाचाही समावेश असतो. मागणीनुसार ही सेवा उपलब्ध करून देण्यात येते. लग्न सोहळ्याच्या ठिकाणी असा आॅर्केस्ट्रा होतो. तसेच वरातीतही गायक किंवा गायिकांसह बेंजो पार्टी कम आॅर्केस्ट्राची सेवा पुरविली जाते.
व्यावसायिकांची अडचण
बेंजो पार्टी व्यावसायिक आतापर्यंत तग धरून आहेत. मात्र अद्यापही त्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे. आधुनिक वादन सामग्री खरेदी करणे, मनुष्यबळाची शोधाशोध आदी अनेक समस्या आहेत. कुशल वादक शोधताना व्यावसायिकांची अडचण होत आहे. नव्याने वादक तयार होत नसल्याने यात अधिकच भर पडली आहे.
अंमलबजावणीकडे दुर्लक्ष
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार डीजेवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे देशभरात कोठेही डीजे वाजविणे गुन्हा आहे. असे असतानाही अनेक डीजे व्यावसायिक डीजे वाजवितात. पोलिसांचे याकडे दुर्लक्ष आहे. ध्वनिप्रदूषण होऊन अनेकांच्या आरोग्याचा आणि जिविताचा प्रश्नही यामुळे निर्माण होत आहे. बेंजो पार्टी आणि सनई-चौघडा आदींसारख्या पारंपरिक वाद्य वादक आणि व्यावसायिकांना याचा फटका बसत आहे.
कुशल वादकांना संधी
बेंजो पार्टीचा व्यवसाय अनेक वर्षांपासून डबघाईस आला होता. शहरासह ग्रामीण भागातील कुशल वादक यामुळे अडचणीत आले होते. नवीन कुशल वादक तयार होत नव्हते. अनेक वादकांना रोजगारासाठी पर्यायी काम शोधावे लागले होते. तर अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. अनेक जण कुटुंबातील इतर सदस्यांवर अवलंबून राहू लागले. अशाच अनेक वादकांवर परावलंबित्व आले; मात्र डीजेवर बंदी येऊन बेंजो पार्टीला पसंती देण्यात आल्याने कुशल वादकांसाठी पुन्हा संधी उपलब्ध झाल्या आहेत.
निवेदक, गायकांनाही संधी
बेंजो पार्टी कम आॅर्केस्ट्रामुळे महिला आणि पुरुष गायकांना संधी आहे. यासह निवेदकालाही संधी आहे. लग्न सोहळ्यादरम्यान विविध चित्रपट गीत सादर करताना निवेदनाची गरज असते. त्यामुळे कुशल आणि उत्कृष्ट निवेदकांना पसंती देण्यात येते. अनेक हौशी गायक आणि निवेदक ‘पार्ट टाइम’ म्हणून अशा संधींच्या शोधात असतात.