सांगवीफाटा जणू मृत्यूचा सापळा
By admin | Published: October 19, 2015 01:44 AM2015-10-19T01:44:51+5:302015-10-19T01:44:51+5:30
पिंपरी-चिंचवड शहराची वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून अनेक रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात आले. मात्र, याचा फायदा वाहनचालकांना होत नसून, रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना होत आहे.
शिवप्रसाद डांगे, रहाटणी
पिंपरी-चिंचवड शहराची वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून अनेक रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात आले. मात्र, याचा फायदा वाहनचालकांना होत नसून, रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना होत आहे. सांगवी फाटा येथे बीआरटीएस रस्त्यावर अनधिकृत हातगाडीवाले, फेरीवाल्या फळविके्रत्यांमुळे या ठिकाणी बाजाराचे स्वरूप येत आहे. त्यामुळे या ठिकाणी अपघाताची शक्यता वाढली आहे. सांगवी फाटा म्हणजे मृत्यूचा सापळा झाला असल्याचे दिसत असल्याने महापालिका प्रशासनाकडून योग्य ती कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
सांगवी फाटा या ठिकाणी उड्डाणपुलाचे काम प्रगतिपथावर आहे. त्यामुळे वाहन चालविताना कसरत करावी लागते. या मार्गाने मावळ, मुंबई, पिंपरी-चिंचवड या परिसरात नागरिक जातात. त्यामुळे या रस्त्यावर नेहमी वाहनांची मोठी वर्दळ असते. याचाच फायदा घेत फळविक्रेत्यांनी चौकाच्या पुढे बीआरटीएस रस्त्यावर ठिय्या मांडला आहे. खरेदी करण्यासाठी ग्राहक वाहतूक नियमांचे पालन न करता अचानक वाहन थांबवितात. अचानक वाहने वळविली जातात. तेथे काही वेळा भांडणाचे प्रकारही घडत आहेत. धोकादायक परिस्थिती असूनही ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाचा अतिक्रमण विभाग कारवाईबाबत उदासीन आहे. भर रस्त्यावर राजरोस अनधिकृत व्यवसाय सुरू असतानाही महापालिकेचे अधिकारी डोळेझाक करीत आहे. त्यामुळे वाहनचालक संताप व्यक्त करीत आहेत.रस्ता रुंदीकरणाचा उद्देश कामचुकार व निष्क्रिय अधिकारी, कर्मचाऱ्यामुळे साध्य होत नाही.
अनेक वेळा अनधिकृत हातगाडीवाले, फेरीवाले, पथारीवाले यांच्यावर कारवाई केली जाते. परंतु, ज्या ठिकाणी कारवाई केली पाहिजे, अशा ठिकाणी कारवाई होत नाही. एखाद्या चौकात अनेक व्यावसायिक असल्यास त्यावर कारवाई होत नाही. मात्र, एखादा हातगाडीवाला रस्त्याच्या कडेला व्यवस्थित व्यवसाय करीत असेल, तर त्याच्यावर हमखास कारवाई होते. सांगवी फाटा, रहाटणी फाटा, शिवार चौक, तापकीर चौक, पाचपीर चौक अशा ठिकाणी कारवाई होणे अपेक्षित असूनही होत नाही. केवळ कारवाईचा आव आणला जातो. मात्र, गल्लीबोळात व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. अशा चौकांतील हातगाड्यांवर कारवाई करण्यासाठी अतिक्रमणविरोधी पथक निघताच हातगाडीवाले बेपत्ता होतात. हे काय गौडबंगाल आहे, असा प्रश्न सर्वसामान्यांना सतावत आहे.
आधुनिक उपनगर म्हणून पिंपळे सौदागरची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. परिसरात कोकणे चौक, गोविंद यशदा चौक व शिवार चौक असे तीन मोठे चौक आहेत. शिवार चौकाची अवस्था फार बिकट आहे. या चौकाला सकाळी -संध्याकाळी यात्रेचे स्वरूप येते. या दोन्ही वेळा शहरातील इतर ठिकाणांहून व्यावसायिक व्यवसाय करण्यासाठी या ठिकाणी येतात. शेकडो गाड्या रस्त्यावर लागलेल्या असतात. त्यामुळे सायंकाळी -सकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. या स्वच्छ सुंदर चौकाला बकाल स्वरूप आले आहे.