माऊलींची पालखी पुण्याकडे निघाली अन् इंद्रायणी पुन्हा फेसाळली! मुख्यमंत्र्यांनी दिले होते आदेश
By विश्वास मोरे | Published: June 30, 2024 12:42 PM2024-06-30T12:42:15+5:302024-06-30T12:42:37+5:30
आळंदी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आले असता त्यांनी प्रशासनाला नदी प्रदूषण रोखण्याबाबत आदेश दिले होते. मात्र, ते जाऊन १२ तास झाले नाही तर इंद्रायणी पुन्हा फेसाळली
पिंपरी: आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरीसाठी रविवारी सकाळी पुण्याकडे निघाली. आणि नेहमीप्रमाणे इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली आहे.
आषाढी वारी सुरू झालेली आहे. इंद्रायणी तीरावरील देहू आणि आळंदीतून संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या पुण्याकडे मार्गस्थ झालेले आहेत. गेल्या वर्षभरापासून इंद्रायणी नदी फेसाळत आहे. मात्र, त्याचे कारण प्रदूषण नियंत्रण मंडळ, पीएमआरडीए, आळंदी नगरपालिका, चाकण एमआयडीसी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांना सापडलेले नाही.
वारीच्या निमित्ताने इंद्रायणी नदीमध्ये पाणी सोडण्यात आले होते. ते पाणी आता कमी झाले आहे. सकाळी माऊलींची पालखी पुणे मुक्कामाकडे मार्गस्थ झाली. आळंदीतील बंधाऱ्यापासून पुन्हा इंद्रायणी नदी फेसाळले आहे. याबाबतचे वृत्त सोशल मीडियावर पसरल्यानंतर प्रशासनाने नदीतील फेस कमी व्हावा यासाठी यंत्रणा सुरू केलेली आहे.
मुख्यमंत्री जाऊन बारा तास झाले नाही, तर इंद्रायणी फेसाळली
आळंदी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आले असता त्यांनी नदी प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली होती. व प्रशासनाला नदी प्रदूषण रोखण्याबाबत आदेश दिले होते. मात्र, ते जाऊन बारा तास होत नाही. तोच इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचे प्रशासनाला कोणतेही देणे घेणे नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत वारकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.