Ashadhi Wari: तुतारी, टाळ मृदंगाचा निनाद अन् विण्याचा झंकार; लाखो वैष्णवांचा मेळा, तुकोबा निघाले विठुरायाच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 04:26 PM2024-06-28T16:26:53+5:302024-06-28T16:30:59+5:30

महिला वारकऱ्यांनी डोक्यावर तुळशीवृंद घेऊन मुखी हरिनामासह ‘‘ज्ञानोबा- तुकाराम’’ हा जयघोष करीत हा पालखी सोहळा लाखो भाविकांचा भक्तीचा महासागर पंढरीच्या वाटेला

Sant Tukaram Maharaj Palkhi ceremony begins, lakhs of warkaris also on their way to Pandharpur | Ashadhi Wari: तुतारी, टाळ मृदंगाचा निनाद अन् विण्याचा झंकार; लाखो वैष्णवांचा मेळा, तुकोबा निघाले विठुरायाच्या भेटीला

Ashadhi Wari: तुतारी, टाळ मृदंगाचा निनाद अन् विण्याचा झंकार; लाखो वैष्णवांचा मेळा, तुकोबा निघाले विठुरायाच्या भेटीला

पंढरीसी जा रे आल्यानो संसारा | दिनाचा सोयरा पांडूरंग  ||
वाट पाहे उभा भेटीचा आवडी | कृपाळू तांतडी उताविळ ||
मागील परिहार पुढे नाही सीन | झालीया दर्शन एकवेळ ||
तुका म्हणे नेदी आणिकांचे हाती |  बैसला तो चित्तीं निवडेना ||

देहूगाव : वैष्णवांचा कैवारी आणि वारकरी संप्रदयाचे श्रध्दास्थान असलेले जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या 33९ व्या पालखी सोहळ्याचे शुक्रवारी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास पंढरपुरकडे प्रस्थान ठेवले. हा वैष्णवांचामेळा भक्तीसागराच्या रुपात सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. सकाळ पासुन ढगाळ हवामान व अधुन मधुन येणाऱ्या पावसाच्या हलक्या सरी आनंदाने अंगावर घेत अत्यंत उत्साही आणि प्रसन्न भक्तीमय वातावरण जलाभिषेक करीत वैष्णवांचे दैवत असलेल्या पांडूरंगाच्या भेटीला जाण्यासाठी तुतारी, टाळ मृदंगाच्या निनाद, विण्याचा झंकार करीत वारकऱी मुक्तपणे ध्येयभान हरखून विविध पाऊलांसह फुगड्या  खेळत आनंद व्यक्त करीत होते. 

जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे लाखो भाविकांच्या साक्षीने शुक्रवारी दुपारी २.२५ वाजता खासदार श्रीरंग बारणे, सुनेत्रा पवार, आमदार सुनील शेळके, महेश लांडगे, अश्विनी जगताप, उमा खापरे, आमदार शेळके यांच्या पत्नी व जेष्ठ वारकरी व पंढरीनाथ महाराज तावरे यांच्या हस्ते झाली. आषाढी वारीत सहभागी झालेले वारकरी खांद्यावर भागवत धर्माची भगवी पताका आणि महिला वारकऱ्यांनी डोक्यावर तुळशीवृंद घेऊन मुखी हरिनामासह ‘‘ज्ञानोबा- तुकाराम’’ हा जयघोष करीत हा पालखी सोहळा लाखो भाविकांचा भक्तीचा महासागर पंढरीच्या वाटेला लागला. चोपदाराचा दंड आणि शिंगाड्याच्या आवाज होताच साऱ्या आसमंतांत मृदंग, टाळ,विणा यांच्या निनाद गुजला आणि सार देऊळवाडा परिसर दमाणून गेला होता. या वातावरणात पालखी पहिल्या मुक्कामासाठी इनामदार वाड्याकडे रवाना झाली.

श्री क्षेत्र देहूगाव मध्ये पालखीचे प्रस्थान असल्याने मुख्य मंदिर, वैंकुठगमण मंदिर परिसरातील इंद्रायणी नदी काठ पहाटे पासूनच फुललेला होता. पहाटे पासून इंद्रायणी नदी काठी आंघोळ करून भाविक दर्शनासाठी जात होते. प्रथेनुसार प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने पहाटे पाच वाजता विठ्ठल रुक्मीनी मंदिरात व शीळा मंदिरात संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख माणिक महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. त्यानंतर पालखी इनामदार वाड्यात आणण्यात आली. दिलीप महाराज मोरे गोसावी यांच्या हस्ते पादुकांची विधीवत पूजा करण्यात आली. ही पूजा उरकल्यानंतर पादुका काल्याचे किर्तन झाल्यानंतर आणि इनामदार वाड्यातून पादुका मानकरी गंगा म्हसलेकर मंडळींच्या ताब्यात देण्यात आल्या. म्हतारबा दिंडीसह ह्या पादुका डोक्यावर घेऊन टाळ मृदंगाच्या तालवर भक्तीमय वातावरणात वाजत गाजत मुख्यमंदिरात आणण्यात आल्या. येथे मंदिराला प्रदक्षिणा घालुन भजनी मंडपात आणल्या. याच वेळी प्रस्थान सोहळ्यासाठी उपस्थित राहण्यासाठी आलेल्या दिंड्या आपआपल्या क्रमाने मुख्यमंदिरात प्रवेश करीत होत्या. या सोहळ्यासाठी मानाच्या दिंड्या, फडकरी व विणेकरी यांनी महाद्वारातून मंदिराच्या आवारात येऊन भजन म्हणत आपला शीनभाग घालवत, पावले खेळत मंदिराला प्रदक्षिणा घालत होते. 

Web Title: Sant Tukaram Maharaj Palkhi ceremony begins, lakhs of warkaris also on their way to Pandharpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.