Ashadhi Wari: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; टाळ मृदंगाचा गजर, तुकोबांचा पालखी प्रस्थान सोहळा सुरु
By विश्वास मोरे | Published: June 28, 2024 02:41 PM2024-06-28T14:41:19+5:302024-06-28T14:42:37+5:30
Sant Tukaram Maharaj palkhi Sohala जगद्गुरु श्री संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा ३३९ व्या पालखी प्रस्थान सोहळा सायंकाळी पंढरीकडे मार्गस्थ होणार
देहूगाव: जगद्गुरु श्री संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा ३३९ व्या पालखी प्रस्थान सोहळ्यास (Sant Tukaram Maharaj palkhi Sohala ) दुपारी दोनला सुरुवात झाली आहे. 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष आणि देहुतील विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात टाळ मृदुंगाचा गजर सुरू झालेला आहे. देहू नगरीतील भक्तीरंग गहिरा झाला आहे. सोहळा आज शुक्रवारी सायंकाळी पंढरीकडे मार्गस्थ होणार आहे.
आषाढी वारीसाठी श्रीक्षेत्र देहू नगरीमध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी दाखल झालेले आहेत. पहाटे श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष, विश्वस्त हस्ते महापूजा करण्यात आली. श्री संत तुकाराम महाराज मंदिर, शाळा मंदिर, या ठिकाणची महापूजा हस्ते करण्यात आली. मंदिरात पहाटे अडीच वाजले पासून भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. श्री संत तुकाराम महाराज मंदिर , मुख्यमंदिर, ज्या ठिकाणाहून पालखी सोहळ्याचे प्रस्थान ठेवले जाणार आहे अशा भजनी मंडपाला, हनुमान मंदिर गरुड मंदिराला, राममंदिर ,महाद्वार या सर्व ठिकाणी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. मंदिर परिसरात आलेले भावीक महिला दर्शन झाल्यानंतर श्री राम मंदिरासमोरील मोकळ्या जागेत फुगड्यांचा खेळ खेळत होते. दरम्यानच्या काळात दर्शन बारी
पालखी मार्गावरील श्री संत तुकाराम महाराजांच्या जन्मस्थानापर्यंत लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या.
इंद्रायणी स्नान!
वारीसोबत चाल चालणाऱ्या दिंड्या सकाळ पासून चाला प्रदक्षिणा घालण्यासाठी शिष्यबद्ध पद्धतीने मंदिराच्या आवारात येत होत्या टाळ- मृदंग आणि हरिनामाच्या गजरामध्ये आपली प्रदक्षिणा पूर्ण करून उत्तर दरवाजाने पुन्हा बाहेर जात होतो. पहाटे पासूनच इंद्रायणी नदीचा काठ भाविकांनी फुलून गेला होता. आंघोळीनंतर पूजा पाठ करण्यात भाविक मग्न झाले होते.
नगरपंचायतीने गेल्या काही दिवसांपासून इंद्रायणी नदीचे पात्र स्वच्छ केले होते. परंतु पाटबंधारे विभागाने सोडलेल्या पाण्यामुळे त्याबरोबर वाहून आलेली पानफुटी यामळे भाविकांनाताना आंघोळ करताना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत होते. पहाटे पासूनच इंद्रायणी नदीचा काठ भाविकांनी फुलून गेला होता.
मंदिर परिसरात गर्दी
इंद्रायणी तीरावरील विठ्ठल -रुक्मिणी मंदिरात सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी होत होती, दुपारी बारानंतर मंदिराच्या आवारात दिंड्या दाखल होऊ लागल्या. दुपारी दोनच्या सुमारास पालखी प्रस्थान सोहळ्याला सुरुवात झाली. यावेळी संत तुकाराम महाराज देवस्थानाचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे सोहळा प्रमुख संजय महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, अजित महाराज मोरे, संतोष महाराज मोरे आदी उपस्थित होते. असतानाही वारकऱ्यांच्या आनंदात तसूरभरही कमतरता जाणवली नाही. मंदिराच्या आवारामध्ये वारकऱ्यांचे खेळ सुरू होते. फुगड्या तसेच हरिनामाचा गजर सुरू होता.