संत तुकाराम महाराजांचे दहावे वंशज संभाजी महाराज देहूकर यांचे निधन

By विश्वास मोरे | Published: June 26, 2024 11:27 AM2024-06-26T11:27:03+5:302024-06-26T11:28:17+5:30

संभाजी महाराज यांनी संत तुकाराम महाराजांच्या जीवन चरित्राचा सांगोपांग अभ्यास करून कीर्तन, प्रवचन आणि चरित्र कथन या माध्यमांतून तुकोबारायांच्या आध्यात्मिक जीवनकार्याचा प्रचार-प्रसार केला

Sant Tukaram Maharaj tenth descendant Sambhaji Maharaj Dehukar passed away | संत तुकाराम महाराजांचे दहावे वंशज संभाजी महाराज देहूकर यांचे निधन

संत तुकाराम महाराजांचे दहावे वंशज संभाजी महाराज देहूकर यांचे निधन

पिंपरी: महाराष्ट्रातील थोर कीर्तनकार, संत साहित्याचे अभ्यासक, संत तुकाराम महाराज संस्थानचे माजी विश्वस्त,  तुकोबारायांचे दहावे वंशज  ह.भ.प. संभाजमहाराज मोरे देहूकर यांचे आज देहावसान झाले.  हभप संभाजी महाराज हे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील देहूगाव येथील रहिवासी आहेत. संभाजी महाराज यांनी संत तुकाराम महाराजांच्या जीवन चरित्राचा सांगोपांग अभ्यास करून कीर्तन, प्रवचन आणि चरित्र कथन या माध्यमांतून तुकोबारायांच्या आध्यात्मिक जीवनकार्याचा प्रचार-प्रसार केला आहे. त्यांनी अनेक वर्ष वीना पादत्राणे वारी केली आहे. 

आषाढी कार्तिकीच्या निमित्ताने त्यांनी महाराष्ट्रभर कीर्तन प्रवचने केली आहेत. त्यांच्या पार्थिवावर इंद्रायणी काठी, श्री क्षेत्र देहू याठिकाणी दुपारी एकला अंत्यसंस्कार होणार आहेत. संभाजी महाराज यांच्या कीर्तनाची परंपरा त्यांचे चिरंजीव प्रशांत महाराज देहूकर ही पुढे नेत आहेत.

देहुकर महाराज यांची ओळख...

- जगद्‌गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे विद्यमान १० वे वंशज आहेत. 

- जगद्‌गुरू संतश्रेष्ठ तुकाराममहाराजांवरील जीवनचरित्रात्मक कादंबरी लिहिली आहे. 

- 'संत तुकाराम महाराज देवस्थान संस्थान' चे माजी विश्वस्त आणि आषाढी वारी पालखी सोहळा प्रमुख.

- 'अखिल भारतीय वारकरी मंडळा'चे माजी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष.

-  २००९ मध्ये महाबळेश्वर येथील ८२व्या अखील भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. आनंद यादव यांनी लिहीलेल्या 'संतसूर्य तुकाराम' या विकृत कादंबरीतून तुकाराम महाराजांचे चारित्र्य हनन केले. म्हणून त्यांच्याविरूद्ध जाहीर निषेध करून साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागितला, तसेच ही कादांबरी मागे घेण्यासाठी पाठपुरावाही केला आणि त्यामुळे ही कादंबरी लेखकाला आणि प्रकाशकाला मागे घ्यावी लागली. समस्त वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या म्हणून त्यांना साहित्य संमेलनाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि अध्यक्षांशिवाय महाबळेश्वर येथील २००९ चे साहित्य संमेलन घ्यावे लागले. यादव आणि प्रकाशक मेहता पब्लिकेशन कं. यांच्या विरूद्ध पुणे येथे मानहानीचा खटला दाखल केला. मा. कोर्टाने त्यांना दंडाची शिक्षा सुनावली.

- आळंदी येथील माऊलींच्या समाधी गाभाऱ्याचे बांधकाम संत तुकाराम महाराजांनी केले, याबाबतचे पुरावे सादर करून त्या ठिकाणी कायमस्वरूपी फलक लावण्यासाठी ह.भ.प. जयसिंग मोरे यांच्या सहकार्याने आग्रही काम केले.

Web Title: Sant Tukaram Maharaj tenth descendant Sambhaji Maharaj Dehukar passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.