तुकोबांसंगे वैष्णव निघाले पंढरीला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 08:17 PM2019-06-24T20:17:21+5:302019-06-24T20:25:30+5:30

देहूगाव येथून जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या ३३४ व्या पालखी सोहळ्याने सोमवारी सायंकाळी पावणेसहाला पंढरीकडे प्रस्थान ठेवले.

sant tukaram palkhi headed towards pandharpur | तुकोबांसंगे वैष्णव निघाले पंढरीला

तुकोबांसंगे वैष्णव निघाले पंढरीला

googlenewsNext

विश्वास मोरे

देहूगाव : भगव्या पताका आसमंती फडकवीत..., टाळ-मृदंगाचा कल्लोळ आणि वीणेचा झंकार करीत..., ज्ञानोबा-तुकाराम असा जयघोष करीत सावळ्या विठुरायाला भेटण्यासाठी श्रीक्षेत्र देहूगाव येथून जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या ३३४ व्या पालखी सोहळ्याने सोमवारी सायंकाळी पावणेसहाला पंढरीकडे प्रस्थान ठेवले. 

‘भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची, उभी देहूनगरी आज नादावली’ अशी अनुभूती देहूनगरीत सोमवारी आली. वैष्णवांच्या गर्दीने इंद्रायणीतीर भक्तिमय झाला होता. प्रस्थान सोहळा असल्याने सकाळपासूनच देहूनगरीत एक वेगळेच चैतन्य जाणवत होते. ढगाळ वातावरण आणि उकाडाही जाणवत होता. असे असतानाही वारीचा उत्साह तसूभरही कमी झालेला नव्हता. तत्पूर्वी सोमवारी पहाटे नैमित्तिक महापूजा झाली. श्रीसंत तुकाराम महाराज संस्थानाच्या वतीने सोहळाप्रमुख संजय मोरे, काशिनाथ मोरे, अजित मोरे यांनी शिळा मंदिरात महापूजा केली. त्यानंतर पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायणमहाराज यांच्या समाधी मंदिरात विश्वस्त माणिक मोरे, विशाल मोरे, संतोष मोरे यांनी महापूजा केली. 

घोडेकर सराफ यांच्याकडे झळाळी देऊन महाराजांच्या पादुका मानकरी म्हसलेकर यांनी इनामदार वाड्यात सकाळी दहाच्या सुमारास आणल्या. तिथे दिलीपमहाराज गोसावी (मोरे) इनामदार यांच्या हस्ते विधिवत पूजा केली. तोपर्यंत मुख्य मंदिरातील वीणा मंडपात हभप रामदास नाना मोरे यांचे काल्याचे कीर्तन सुरू होते. 

सकाळपासूनच इंद्रायणीत स्रान करून वारकरी मंदिरात दर्शन घेण्यास येत होते. प्रस्थानाची वेळ जवळ येऊ लागली, तशी मंदिराच्या आवारात दिंडीकऱ्यांची गर्दी होऊ लागली. टाळ-मृदंगाचा कल्लोळ सुरू झाला. वीणेचा झंकाराने वातावरण भक्तिमय झाले. अडीचला प्रस्थान सोहळा सुरू झाला. या वेळी राज्यमंत्री बाळा भेगडे, खासदार श्रीरंग बारणे, देवस्थानाचे अध्यक्ष मधुकर मोरे आदी उपस्थित होते. तोपर्यंत मानाचे अश्व मंदिरात दाखल झाले. त्या वेळी अकलूज आणि बाभूळगावकरांच्या अश्वांचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. विणेकऱ्यांचा सत्कार झाला. त्यानंतर ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल...’ म्हणत देहूतील तरुणांनी पालखी खांद्यावर घेतली आणि तुतारी वाजली. ‘ज्ञानोबा-तुकोबा’ हा जयघोष टीपेला पोहोचला. वीणा मंडपातून पालखी बाहेर आली. त्या वेळी देहभान विसरून वारकऱ्यांनी फुगड्या घातल्या. वारीतील खेळही रंगले होते. मंदिर प्रदक्षिणा करून सोहळा सायंकाळी पंढरीकडे निघाला. आज आजोळघरी इनामदारवाड्यात मुक्काम होणार असून, उद्या आकुर्डीतील मुक्कामासाठी सोहळा मार्गस्थ होईल.

Web Title: sant tukaram palkhi headed towards pandharpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.