पिंपरी महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपातर्फे संतोष लोंढे यांचा अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2020 05:50 PM2020-03-02T17:50:05+5:302020-03-02T17:50:54+5:30
भाजपचे स्थायीत बहुमत असल्याने भाजपाचा अध्यक्ष होणार हे स्पष्ट
पिंपरी : महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी सत्ताधारी भाजपाच्या संतोष लोंढे यांचा अर्ज सोमवारी ( दि. २ मार्च ) दाखल करण्यात आला आहे. स्थायी समितीमध्ये भाजपाचे बहुमत आहे. त्यामुळे त्यांची निवड निश्चित मानली जात आहे. त्यावर अधिकृतरित्या शुक्रवारी शिक्कामोर्तब होईल. लोंढे यांच्या अर्जावर सूचक म्हणून सुवर्णा बुर्डे आणि अनुमोदक म्हणून राजेंद्र लांडगे यांची स्वाक्षरी आहे. यावेळी महापौर उषा ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, सभागृह नेते नामदेव ढाके, मावळते स्थायी समिती सभापती विलास मडीगेरी, माजी महापौर राहुल जाधव, भीमाबाई फुगे, नगरसेवक कुंदन गायकवाड उपस्थित होते.
महापालिकेच्या स्थायी समितीत 16 सदस्य असतात. भाजपचे 10, राष्ट्रवादी काँग्रेसचे 4, शिवसेना 1 आणि अपक्षांचा एक नगरसेवक संख्याबळानुसार स्थायी समितीत नियुक्त झाले आहेत. अपक्ष सदस्य भाजपासोबत आहेत. भाजपाचे स्थायीत बहुमत असल्याने भाजपाचा अध्यक्ष होणार हे स्पष्ट आहे. त्यावर शुक्रवारी शिक्कामोर्तब होईल शुक्रवारी निवडणूक पुणे विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी स्थायी समिती अध्यक्षपदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार आज दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळेत नामनिर्देशन पत्रे स्वीकारली आहेत. 6 मार्च रोजी दुपारी बारा वाजता अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल कामकाज पाहणार आहेत.
....
स्थायी समिती अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज भालेकर यांचा अर्ज पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज भालेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. स्थायी समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 सदस्य असून भाजप 11 सदस्यांसह बहुमतात आहे.यावेळी विरोधी पक्षनेते नाना काटे, स्थायीचे सदस्य मयुर कलाटे, पौर्णिमा सोनवणे, माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसेवक प्रवीण भालेकर आदी उपस्थित होते. भालेकर यांच्या अर्जावर सूचक म्हणून मयुर कलाटे तर अनुमोदक म्हणून पौर्णिमा सोनवणे यांची स्वाक्षरी आहे.
महापालिकेच्या स्थायी समितीत 16 सदस्य असतात. भाजपाचे 10, राष्ट्रवादी काँग्रेसचे 4, शिवसेना 1 आणि अपक्षांचा एक नगरसेवक संख्याबळानुसार स्थायी समितीत नियुक्त झाले आहेत. अपक्ष सदस्य भाजपसोबत आहेत. भाजपचे स्थायीत बहुमत असल्याने भाजपाचा अध्यक्ष होणार हे स्पष्ट आहे. चार सदस्य असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे निवडणूक होण्याची शक्यता आहे.