सोनसाखळी चोरट्यांसह चोरीचे दागिने घेणारे सराफ जेरबंद; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
By नारायण बडगुजर | Published: December 18, 2023 08:18 PM2023-12-18T20:18:25+5:302023-12-18T20:18:39+5:30
पोलिसांनी संशयितांकडे सखोल चौकशी करून त्यांच्याकडून २५५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले
पिंपरी : महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावणाऱ्या टोळीला पिंपरी-चिंचवडच्या गुन्हे शाखा युनिट चारने बेड्या ठोकल्या. संशयितांकडून १४ गुन्हे उघड झाले असून १६ लाख ३० हजारांचे २५ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले.
आनंद सुनील साळुंखे उर्फ लोहार (वय १९), धीरज गोपाळ गवळी (३१, दोघेही रा. खडकी), अक्षय अशोक मुरकुटे (३१, रा. धानोरी, पुणे), गणपत जवाहरलाल शर्मा (४४, रा. खडकी), दर्शन रमेश पारीख (३२, खडकी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी- चिंचवड शहरातील सांगवी आणि कासारवाडी भागात सोनसाखळी हिसकावणाऱ्या आरोपींवर भोसरी आणि सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन्ही घटनांमध्ये एकाच पद्धतीने सोनसाखळी हिसकावण्यात आली होती. मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या महिलांना लक्ष करून हे चोरटे सोनसाखळी हिसकावत असायचे. पोलिसांनी ८० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज आणि खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी कारवाई करत संशयित आनंद लोहार याला खडकी परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर संशयित महादेव उर्फ महाद्या उर्फ अजय गौतम थोरात (रा. खडकी) याच्यासह महाळुंगे पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरी करून गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
संशयित आनंद हा चोरीचे दागिने अक्षय मुरकुटे आणि धीरज गवळी यांच्यामार्फत ज्वेलर्स गणपत शर्मा आणि दर्शन पारिख यांना विकत असल्याचे पोलिस तपासात पुढे आले. त्यामुळे या गुन्ह्यात गणपत शर्मा आणि दर्शन पारिख यांनाही पोलिसांनी अटक केली.
पोलिस उपयुक्त स्वप्ना गोरे, सहायक आयुक्त सतीश माने, बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट चारचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पाटील, सहायक निरीक्षक सिद्धनाथ बाबर, उपनिरीक्षक गणेश रायकर, आबासाहेब किरनाळे, सहायक उपनिरीक्षक नारायण जाधव, संजय गवारे, दादा पवार, अदिनाथ मिसाळ, पोलिस अमंलदार प्रवीण दळे, तुषार शेटे, मोहम्मद गौस नदाफ, सुरेश जायभाये, रोहिदास आडे, वासुदेव मुंडे, सुनील गुट्टे, प्रशांत सैद, धनाजी शिंदे, गोविंद चव्हाण, सुखदेव गावंडे यांनी केली आहे.
चौदा गुन्हे उघडकीस
पोलिसांनी संशयितांकडे सखोल चौकशी करून त्यांच्याकडून २५५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले. एकूण १६ लाख ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. सांगवी, हिंजवडी, भोसरी, चिखली, म्हाळुंगे एमआयडीसी, विश्रांतवाडी, कोरेगाव पार्क व भोसरी एमआयडीसी या पोलिस ठाण्यांत दाखल असलेले सोनसाखळीचे १३ व वाहनचोरी प्रकरणी एक असे एकूण १४ गुन्हे उघडकीस आणले.
सराईत गुन्हेगार
सोनसाखही प्रकरणातील संशयित हे सराईत असल्याचे तपासातून समोर आले. यातील आनंद लोहार याच्या विरोधात सांगवी पोलिस ठाण्यात एक तर खडकी पोलिस ठाण्यात आठ गुन्हे दाखल आहेत. संशयित धीरज गवळी याच्या विरोधात भोसरी, मंचर, खडकी पोलिस ठाण्यात प्रत्येकी एक आणि विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. संशयित महादेव थोरात याच्या विरोधात खडकी व स्वारगेट पोलस ठाण्यात प्रत्येकी एक तर बंडगार्डन पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत.