बचत गट, शेतकऱ्यांची कोंडी
By admin | Published: November 17, 2016 03:03 AM2016-11-17T03:03:29+5:302016-11-17T03:03:29+5:30
जिल्हा सहकारी बँकांना भारतीय रिझर्व्ह बँकेने नोटा स्वीकारण्यास निर्बंध घातल्याने प्रामुख्याने महिला बचत गट व शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
देहूरोड : जिल्हा सहकारी बँकांना भारतीय रिझर्व्ह बँकेने नोटा स्वीकारण्यास निर्बंध घातल्याने प्रामुख्याने महिला बचत गट व शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. महिला बचत गटांची, पयार्याने सामान्य महिलांची आर्थिक कोंडी झाली आहे.
मंगळवारपासून जिल्हा बँकेच्या देहूरोड शाखेत खाते असलेल्या देहूरोड व किवळे-रावेत परिसरातील विविध महिला बचत गट व शेतकऱ्यांसह सर्वच खातेदारांकडून पाचशे व हजाराच्या नोटा स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यामुळे महिलांनी घरखर्चात काटकसर करून पोटाला चिमटा घेऊन बचत गटात ठेवलेली बचत ठेवायची कोठे, असा संतप्त सवाल बचत गटाच्या महिलांनी उपस्थित केला असून, सरकारने या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी महिलांनी केली आहे.
रिझर्व्ह बँकेने रद्द झालेल्या हजार, पाचशेच्या नोटा जिल्हा बॅँकेच्या खातेदारांकडून स्वीकारण्यावरही निर्बंध घातले आहेत. देहूरोड येथील पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या शाखेत परिसरातील चिंचोली , किवळे, विकासनगर , रावेत ,मामुर्डी आदी भागातील खातेदार असून, परिसरातील महिला बचत गटांची व शेतकऱ्यांची सर्वाधिक खाती आहेत. बचत गट संकल्पना सुरू झाल्यापासून जिल्हा बँकेने परिसरातील महिला गटांना शासन निर्णयानुसार कर्ज उपलब्ध केले असून, त्यातून महिलांनी घरगुती उद्योग सुरू केले आहेत. तसेच दैनंदिन गरजा, आजारपण, मुलामुलींच्या लग्नाला बचत गटात केलेल्या बचतीचा हातभार लागत आहे.
दरमहा बचत गटाकडे जमा झालेली बचत, तसेच कर्जरूपाने दिलेल्या रकमेचे हप्ते, व्याज सर्वसाधारणपणे दहा ते पंधरा तारखेपर्यंत जमा होत असते. त्यानुसार दहा तारखेपासून बचत गटाकडे शंभर, पाचशे व हजाराच्या नोटा जमा झाल्या असून, बुधवारी येथील जिल्हा बँकेत नोटा जमा करण्यास महिला गेल्या असता, बँकेला नोटा स्वीकारण्यास मनाई केली असल्याचे बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. नोटाबंदीने महिला हैराण झाल्या असून या नोटांचे काय करायचे, असा प्रश्न त्यांना पडला आहे.
नोटांना बंदी असल्याने ज्यांना बचत गटाकडून कर्ज हवे आहे त्या महिलाही कर्ज घेण्यास नकार देत आहेत. त्यामुळे महिला बचत गटांची आर्थिक कोंडी झाली आहे. सरकारने आमची बचत तातडीने बँकेत जमा करण्याबाबत सूचना द्याव्यात, अशी मागणी केली आहे.
रांगेतील नागरिकांना मदत
पवनानगर : बॅँकात नोटा बदलण्यासाठी आणि रक्कम काढण्यासाठी दिवसभर रांगेत उभे राहणाऱ्या नागरिकांना भाजपा कार्यकर्त्यांनी चहा आणि पाणी वाटप केले. बँक आॅफ महाराष्ट्र पवनानगर येथे बँकेच्या खातेदार आणि इतरांना ही सेवा देण्यात आली.
या वेळी भाजयुवा मोर्चा तालुका सरचिटणीस गणेश ठाकर,भाजपा विद्यार्थी आघाडी उपाध्यक्ष जयेश खुंटाळे, सचिन मोहिते, विकास दहिभाते, अमित मोहळ, सूरज ठाकर उपस्थित होते. (वार्ताहर)\