सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : नोकऱ्यांत अभ्यासक्रमांचा अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 11:45 PM2018-08-27T23:45:01+5:302018-08-27T23:45:21+5:30

अभ्यास मंडळे कधी होणार कार्यरत?

Savitribai Phule Pune University | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : नोकऱ्यांत अभ्यासक्रमांचा अडसर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : नोकऱ्यांत अभ्यासक्रमांचा अडसर

Next

दीपक जाधव 

पुणे : वेगाने बदलणारे तंत्रज्ञान, उद्योग-व्यवसायांमध्ये सातत्याने होणारे बदल याची जाण असणाºया मनुष्यबळाची कंपन्यांना गरज आहे. मात्र महाविद्यालये, विद्यापीठांमधील अभ्यासक्रमांमध्ये याचा समावेश नसल्याने पदव्या घेऊन बाहेर पडणाºया विद्यार्थ्यांना त्या नोकºया मिळविण्यात अपयश येत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अभ्यासक्रम निश्चित करण्याची जबाबदारी असलेल्या विविध विषयांची अभ्यास मंडळे कार्यरत नसल्याने त्याचा मोठा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे.

सर्वच उद्योग-व्यवसायांमध्ये आर्टिफिशल इंटेलिजन्स, बिग डाटा, हाडूप, सायबर सिक्युरिटी आदी नव्या तंत्रज्ञानामुळे आमूलाग्र बदल होत आहेत. त्याचबरोबर देशपातळीवर वाणिज्य क्षेत्रात जीएसटी कायदा लागू झाल्यानंतर संपूर्ण करप्रणालीच बदलली आहे. यानुसार विद्यापीठातील अभ्यासक्रमांमध्ये योग्य ते बदल होणे आवश्यक आहे. विद्यापीठातील काही अभ्यासक्रम २०१० ते २०१३ या कालावधीमध्ये बदलले गेले आहेत. त्यानंतर अभ्यासक्रम निश्चित करणारे अभ्यास मंडळच अस्तित्वात नसल्याने जैसे थे परिस्थिती राहिली आहे. अभ्यासक्रम बदलणे ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे, आता जरी अभ्यास मंडळाचे कामकाज सुरू झाले तरी लगेच सर्व अभ्यासक्रम बदलता येत नाही. पहिल्यांदा प्रथम वर्ष, त्यानंतर पुढच्या वर्षी द्वितीय वर्ष अशा टप्प्याटप्प्याने ते बदलावे लागतात. त्यामुळे या बदलांसाठी मोठी प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय नाही. कला, वाणिज्य व विज्ञान शाखांचे पारंपरिक अभ्यासक्रमांबरोबर विविध प्रकारचे व्यावसायिक अभ्यासक्रम विद्यापीठाकडून राबविले जातात. विद्यापीठाशाी ४००पेक्षा जास्त महाविद्यालये संलग्न आहेत. त्यांच्या सर्व अभ्यासक्रमांची जबाबदारी या अभ्यास मंडळांवर आहे. या महाविद्यालयांमध्ये तसेच विद्यापीठ स्तरांवर विविध कंपन्यांकडून प्लेसमेंट कार्यक्रम राबविले
जातात. त्या वेळी विद्यार्थी शिकत असलेले अभ्यासक्रम व कंपन्यांची गरज यामध्ये तफावत असल्याचे दिसून येते.
विद्यापीठातील सर्व विषयांच्या अभ्यास मंडळांची मुदत आॅगस्ट २०१५ मध्ये संपली. त्यानंतर नवीन सार्वजनिक विद्यापीठ कायदा लागू होणार असल्याने अभ्यास मंडळांच्या नियुक्त्या करण्यात आल्या नाहीत. मार्च २०१६ पासून नवीन विद्यापीठ कायदा लागू झाल्यानंतर कुलगुरूंचा कार्यकाळ संपत आल्याने ही निवड झाली नाही.
नवीन कुलगुरू आल्यानंतर निवडणुका होऊन जानेवारी २०१८ मध्ये अभ्यास मंडळांवरील सदस्यांची निवड झाली. त्यानंतर कुलगुरू नियुक्त सदस्यांची अभ्यास
मंडळांवर निवड होऊन त्याचे कामकाज लगेच सुरू व्हायला हवे होते. मात्र त्यानंतरही ७ महिने उलटले तरी या नियुक्त्या होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे अभ्यास मंडळांचे कामकाजच अद्याप सुरू होऊ शकलेले नाही.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेली अनेक महाविद्यालये पारंपरिक अभ्यासक्रमांबरोबरच स्थानिक व्यवसायांना पूरक कौशल्य अभ्यासक्रम उपलब्ध करून देत आहेत. या अभ्यासक्रमांना विद्यापीठाच्या अभ्यास मंडळांची परवानगी घेणे आवश्यक असते. नवीन कोर्स आणायचा असेल तर अभ्यास मंडळांची मान्यता लागते. मात्र अभ्यास मंडळेच अस्तित्वात नसल्याने या महाविद्यालयांची अडचण होते आहे.

ड्युएल डिग्री स्किल संकल्पना राबवावी
ड्युएल डिग्री स्किल ही संकल्पना महाविद्यालय स्तरावर राबविली जाणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना पारंपरिक पदव्यांबरोबरच एखादा शॉर्ट डिप्लोमा कोर्स करणे बंधनकारक करणे आवश्यक आहे.
त्याचा विद्यार्थ्यांना तसेच उद्योग
क्षेत्रालाही खूप चांगला फायदा होऊ शकेल अशी अपेक्षाही करिअर तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

अभ्यासक्रम बदलाचा गांभीर्याने विचार व्हावा
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, बिग डाटा, सायबर सिक्युरिटी या तंत्रज्ञानामुळे मशीन इंडस्ट्री, आॅटोमोबाईल, मेडिकल, फार्मसी, डिफेन्स अशा अनेक क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. मात्र याचा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांमध्ये कुठेच समावेश नाही. विद्यापीठाचे अभ्यासक्रम अनेक वर्षे जुने आहेत. विद्यार्थी खासगी कॉम्प्युटर क्लासला जाऊन या बदललेल्या अभ्यासक्रमांचे शिक्षण घेत आहेत. याचा विद्यापीठाने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
- डॉ. हेमंत अडसूळ,
करिअर मार्गदर्शक

Web Title: Savitribai Phule Pune University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.