सावित्रीच्या लेकींना सायकलवाटप
By admin | Published: September 1, 2016 01:18 AM2016-09-01T01:18:47+5:302016-09-01T01:18:47+5:30
स्त्रियांसाठी काम करणाऱ्या फ्लो मुंबई चॅप्टर (फिकी ) या संस्थेतर्फे सेवाधाम येथे मावळातील दुर्गम भागातील गरजू विद्यार्थिनींना सायकलवाटप करण्यात आले.
कामशेत : साईबाबा सेवाधाम या कान्हे फाटा येथील अंध व अपंग संस्थेच्या मदतीने स्त्रियांसाठी काम करणाऱ्या फ्लो मुंबई चॅप्टर (फिकी ) या संस्थेतर्फे सेवाधाम येथे मावळातील दुर्गम भागातील गरजू विद्यार्थिनींना सायकलवाटप करण्यात आले.
गरजू विद्यार्थिनींना साईबाबा सेवाधाम संस्थेमध्ये सायकलीवाटप करण्यात आल्या. फिकी संस्थेच्या अध्यक्षा स्वाती मयेकर व माजी अध्यक्षा सुचेता शहा व संस्थेच्या सदस्या उपस्थित होत्या. संस्थेने गेल्या चार वर्षांत साईबाबा सेवाधाम संस्थेच्या मदतीने मावळातील अनेक ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना आत्तापर्यंत ६४ सायकली वाटल्या असून, इतरही उपक्रम राबवले आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी शौचालयाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
मावळ तालुक्यातील अनेक गावे दुर्गम भागात आहेत. तेथून मोठ्या गावातील शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना खडतर प्रवास करून यावे लागते. अनेक गावात एस.टीची सोय नाही. खासगी वाहनांची व्यवस्थाही उपलब्ध होत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागते.
संस्थेतर्फे राबवल्या जाणाऱ्या उपक्रमात स्त्रियांना स्वावलंबी बनवणे हा मुख्य उद्देश असून, त्या दृष्टीने संस्थेतर्फे मोफत रिक्षा, चारचाकी वाहन चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. फॅशन डिझायनिंग, कुकिंग असे विविध उपक्रम राबवले जातात. भविष्यात साईबाबा सेवाधाम संस्थेबरोबर ग्रामीण भागातील महिलांसाठी विविध उपक्रम राबवण्याचा संकल्प असल्याचे अध्यक्षा मयेकर यांनी सांगितले.
सेवाधाम संस्थेच्या प्रमुख डॉ. स्वाती वेदक व विजया डाखोरे यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. शाळांच्या वतीने आनंद केसकर यांनी आभार मानले. सूत्रसंचालन समाधान साखरे यांनी केले. सेवाधामचे व्यवस्थापक दत्तात्रय चांदगुडे, लिखित नाशिककर, महेंद्र पाटील, रामदास चांदगुडे, सदाशिव वरघडे, रोहिणी अग्रहारकर यांनी विशेष परिश्रम घेतले. (वार्ताहर)