अनलॉकमध्ये ‘मला राग येतोय...’ म्हणणं पडतंय महागात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2020 08:09 PM2020-11-10T20:09:02+5:302020-11-10T20:12:24+5:30

क्षुल्लक कारणांवरून अनेकांचा संयम सुटत असून होताहेत हल्ले

Saying 'I'm angry ...' in Unlock is very expensive! crime incidents increasing | अनलॉकमध्ये ‘मला राग येतोय...’ म्हणणं पडतंय महागात!

अनलॉकमध्ये ‘मला राग येतोय...’ म्हणणं पडतंय महागात!

googlenewsNext
ठळक मुद्देक्षुल्लक कारणांवरून केली जातेय दुखापतसप्टेंबरमध्ये ३७, तर ऑक्टोबरमध्ये ७३ गुन्हे दाखल

नारायण बडगुजर-
पिंपरी : जुन्या भांडणाचा राग, भांडणातील मध्यस्थी, लहान मुलांमध्ये खेळताना झालेला वाद, यासारख्या क्षुल्लक कारणांवरून अनेकांचा संयम सुटत आहे. यातून मारहाण करून दुखापत केली जात आहे. दुखापत केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध पोलीस ठाण्यांत सप्टेंबरमध्ये ३७ तर ऑक्टोबरमध्ये ७३ गुन्हे दाखल झाले आहेत. लाॅकडाऊन शिथिल होत असताना हे गुन्हे दुपटीने वाढल्याने चिंता व्यक्त होत आहे.

कोरोना महामारीमुळे लाॅकडाऊन जाहीर झाल्यानंतर एप्रिलमध्ये गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले होते. नागरिक घरातच असल्याने थेट संपर्क कमी झाला होता. मात्र लाॅकडाऊन शिथिल होत असतानाच नागरिक घराबाहेर पडण्याचे प्रमाण वाढले. तसेच लहान मुलेही घराबाहेर येऊ लागले आहेत. खेळताना त्यांच्यात वाद होतात. त्यातून बहुतांशवेळा पालकांमध्ये ‘जुंपून’ हातापायी होत असल्याचे दिसून येते. तसेच भररस्त्यात वाहन पार्क करणे, ओव्हरटेक करणे, गाडी बाजूला घेण्यास सांगणे, गाडी रस्त्यात वाहनासमोर आडवी लावणे, अशा कारणांवरून राग अनावर होऊन गंभीर दुखापत केली जात आहे.

कोरोना काळात अनेक नाती दुरावली, तर अनेक दुरावलेली नाती जवळ आली. मात्र, काही ठिकाणी किरकोळ कारणांवरून वादाचे प्रकारही घडले आहेत. मात्र, प्रत्येकानेच रागावर नियंत्रण ठेवायला हवे, असे मानसोपचार तज्ज्ञांनी सांगितले. 

जडणघडणीवर परिणाम
प्रत्येकाच्या वर्तवणुकीला पार्श्वभूमी असते. जन्मजात अर्थात अनुवांशिक गुणधर्म, मानसिक वाढ आणि सामाजिक परिस्थिती याचा परिणाम प्रत्येकाच्या जडणघडणीवर होतो. त्यातून प्रत्येकाचे व्यक्तीमत्व घडते. प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखावी. त्यामुळे चुकीच्या किंवा गुन्हेगारी कृत्यांना आळा बसण्यास मदत होईल. व्यसने टाळल्यास चिडचिड होणार नाही. राग नियंत्रित राहील.  
- डॉ. मनजित संत्रे,  मानसोपचारतज्ज्ञ, वायीसीएम रुग्णालय, पिंपरी 

...तर प्रतिबंधात्मक कारवाई
तत्कालीन परिस्थिती आणि कारणांमुळे वाद होतात. वादावर नियंत्रण मिळविणे शक्य असते. थोडा वेळ संयम ठेवल्यास पुढील अनर्थ टळतो. त्यासाठी सर्वांनीच संयम ठेवावा. किरकोळ कारणावरून असे गुन्हे घडले आहेत. सर्व गुन्हे उघडकीस आले आहेत. शरीरास दुखापत केल्याप्रकरणात कडक कारवाई तसेच दोन किंवा जास्त गुन्हे करणाऱ्या आरोपींवर प्रतिबंधक कारवाई सुरू आहे.
- आर. आर. पाटील,  सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे), पिंपरी-चिंचवड

सूडभावना बळावतेय...
अनेक जण जुन्या भांडणाचा राग मनात धरून असतात. सूडभावनेतून काेणत्याही क्षुल्लक कारणावरून त्यांच्याकडून वाद उकरून काढला जातो. यातून मारहाण करून दुखापत केली जाते. पोलिसांकडे तक्रार का केली, तक्रार मागे घे, तुला बघून घेतो, असे म्हणून हत्याराचा वापर करून जखमी केले जाते.

रागावर नियंत्रणासाठी...
दीर्घ श्वास घ्यावा 
प्रतिक्रिया न देता शांत रहा
मनात १०० पर्यंत क्रमांक मोजावेत
वाद होत असलेल्या जागी थांबू नका
पाणी प्यावे, थोडे चालावे 


दुखापतीचे दाखल गुन्हे
जानेवारी ते ऑक्टोबर - ५१५ 
ऑगस्ट   सप्टेंबर   ऑक्टोबर 
 ३४         ३७           ७३

Web Title: Saying 'I'm angry ...' in Unlock is very expensive! crime incidents increasing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.