पिंपरीतील घरकुल येथे टोळक्याचा राडा! कोयता, सिमेंटच्या गट्टूने वाहनांची तोडफोड
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 12:34 PM2021-05-30T12:34:33+5:302021-05-30T12:34:39+5:30
दहशत माजवल्याप्रकरणी सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल
पिंपरी: पिंपरी - चिंचवड शहरात टोळक्याचा राडा सुरूच असून वाहनांच्या तोडफोडीचे प्रकार सातत्याने घडत आहेत. अशाच पद्धतीने कोयता व सिमेंटच्या गट्टूने वाहनांची तोडफोड केली. तसेच आरडाओरडा करून दहशत माजवली. याप्रकरणी सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. घरकुल, चिखली येथे शनिवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली.
अतुल निसर्गंध तसेच चंद्या उर्फ महेश चंदनशिवे, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह मन्या कोरी, निसर्गंध याचा लहान भाऊ तसेच त्यांच्यासोबत असलेले इतर दोन साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश उर्फ सिद्धार्थ बालाजी गायकवाड (वय २८, रा. घरकुल, चिखली) यांनी या प्रकरणी रविवारी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी कोयत्याने व सिमेंटच्या गट्टूने दुचाकी व चारचाकी वाहनांची तोडफोड केली. त्यावेळी गायकवाड व इतर लोक येथे आले असता आरोपींनी त्यांच्या दिशेने सिमेंटचे गट्टू फेकले. तसेच त्यांनी लोकांना पाहून आरडाओरडा करून शिवीगाळही केली. जो आमच्या नादी लागेल त्याला मारून टाकू अशी धमकी देऊन काही कारण नसताना परिसरात दहशत माजवली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने पुढील तपास करत आहेत.