वाचनालयाने घेतली शाळा दत्तक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 02:54 AM2017-08-04T02:54:31+5:302017-08-04T02:54:31+5:30
भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून सोहम सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने संत तुकारामनगर येथील महापालिकेचे माध्यमिक विद्यालय दत्तक घेण्यात आले आहे.
पिंपरी : भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून सोहम सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने संत तुकारामनगर येथील महापालिकेचे माध्यमिक विद्यालय दत्तक घेण्यात आले आहे. आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी व त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा, यासाठी विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी मोफत पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत. दर तीन महिन्यांनी विद्यार्थ्यांनी काय वाचले, याचा आढावा घेण्यात येणार आहे.
या वेळी माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापक माधुरी रांगणेकर व वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष जगन्नाथ नेरकर, तसेच प्रमुख पाहुण्या म्हणून नगरसेविका सुजाता पालांडे, सुलक्षणा शिलवंत उपस्थित होत्या. प्रास्ताविकात जगन्नाथ नेरकर यांनी उपक्रमाची माहिती दिली.
सुजाता पालांडे व सुलक्षणा शिलवंत यांनीही विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून दिले. गौरव चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. हेमा वैशंपायन यांनी आभार मानले. या वेळी सुधाकर शिंदे, प्रदीप बोरसे व इतर मान्यवर उपस्थित होते. असाच उपक्रम शहरातील इतर ठिकाणी राबविण्यात येणार आहे.
सामाजिक संस्थांनी अशा उपक्रमांचे अनुकरण करावे, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांमधून होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागेल, असा विश्वासही व्यक्त होत आहे.