स्कूल बसचा प्रताप, ट्रॅफिक जॅमचा त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 12:16 AM2018-10-02T00:16:21+5:302018-10-02T00:16:53+5:30
कामशेत : अपघातामुळे रेल्वेगेटचे बुंग तुटले; वाहनांच्या लागल्या रांगा; चालकांना त्रास
कामशेत : मध्य रेल्वेच्या रेल्वे ट्रॅकवर कामशेत शहरातील गेट नं. ४३ वर सोमवारी (दि. १) सकाळी ७:४० वाजण्याच्या सुमारास एका स्कूल बसची धडक बसली. त्यात डाऊन ट्रॅक वरील रेल्वे गेटचे बुंग तुटले. यामुळे रेल्वे गेटचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन सुमारे दीड तास हे गेट बंद होते. या गेटच्या अलीकडे व पलीकडे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून नाणे मावळातील नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.
लोहमार्ग पोलिसांनी व गेटमन यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी ७:४० च्या सुमारास पुण्याकडून लोणावळ्याला जाणाऱ्या लोकलसाठी (क्र. एल ८९९०८) गेट बंद करत असताना नाणे मावळातून अचानक भरधाव वेगात आलेल्या स्कूल बसने (क्र. एमएच ०४ जी ९०१३) रेल्वे गेटला धडक दिली. त्यामुळे डाऊन ट्रॅकवरील रेल्वेगेटचा बुंग तुटला. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी स्कूलबस चालक अंकुश लक्ष्मण गायकवाड (वय ३७ रा. काम्ब्रे, नाणे मावळ) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. रेल्वे गेट वाहनाच्या धडकेत तुटल्याने रेल्वे गाड्या काहीकाळ उशिराने धावत होत्या. आॅटोमॅटिक सिग्नल यंत्रणेचे अविनाश पडवकर व कर्मचारी हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तळेगाववरून नवीन बुंग मागवला तो सकाळी ९.३५ वाजे पर्यंत तातडीने बसवून नाणे रोडची वाहतूक सुरळीत केली. सकाळची वेळ असल्यामुळे नाणे मावळातून मोठ्या प्रमाणावर आलेल्या विद्यार्थी, कामगारवर्ग, दुग्ध व्यावसायिक यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. तसेच रेल्वे गाड्याही उशिराने धावल्या. त्यामुळे स्कूल बस चालकावर गुन्हा दाखल केला असून, याप्रकरणी अधिक तपास लोहमार्ग पोलीस पी. एस. कुजूर करीत आहेत.