शाळेतील समित्या केवळ कागदावर
By admin | Published: August 8, 2015 12:27 AM2015-08-08T00:27:05+5:302015-08-08T00:27:05+5:30
शहरातील महापालिका व इतर अनुदानित शाळांना समित्यांची नेमणूक करणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक शाळांमध्ये समित्या फक्त कागदोपत्रीच आहेत
पिंपरी : शहरातील महापालिका व इतर अनुदानित शाळांना समित्यांची नेमणूक करणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक शाळांमध्ये समित्या फक्त कागदोपत्रीच आहेत. त्यांच्या माध्यमातून वास्तव्यात काहीच काम होत नाही. फक्त अनुदान घेण्यासाठी समित्या स्थापन केल्या जातात, असा आरोप पालकांनी केला आहे. तर, या समिती कार्यरत आहेत. याबाबत एकही तक्रार आली नसल्याचे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे.
पिंपरी -चिंचवड शहरात सुमारे ३५० अनुदानित शाळा आहेत. महापालिकेच्या १३२ शाळा आहेत. या शाळांमध्ये मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय व्यवस्थापन समिती, शिक्षक-पालक संघ, माता-पालक संघ, परिवहन समिती व पर्यावरण समिती नेमल्या आहेत. त्यात मागील वर्षी महिला तक्रार निवारण समितीची वाढ झाली आहे. या समित्यांवर सेवानिवृत्त शिक्षक, कर्मचारीवर्ग, सर्व शिक्षा अभियानाचे सदस्य, पालक असे १२ ते १६ सदस्य असतात. मात्र, या समित्या शहरातील अनेक शाळांमध्ये कार्यरत नसल्याने पालकवर्गात नाराजीचे वातावरण पसरले आहे. अधिकाऱ्यांना दाखवण्यासाठी फक्त कागदोपत्री समित्या नेमल्या जातात. प्रत्यक्षात मात्र ठोस असे काहीच काम समित्यांकडून होत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. शहरातील काही नामांकित व मोजक्या शाळा वगळता इतर शाळांमध्ये या समितींचे काम दिसून येत नसल्याचेही त्यांनी सांगितले.
शाळेच्या कामकाजाची देखरेख करणे, कार्यक्रमांना दिशा देणे अशी कामे शाळा व्यवस्थापन समितीत केली जातात. मुलांनी डब्यात काय आणावे, पौष्टिक पदार्थ कोणते याबाबतच्या जागृतीचे काम माता-पालक संघाकडे असते. मुलांना परिसर भेटीला न्यायचे असल्यास अथवा स्पर्धेसाठी जाण्याचे झाल्यास मदत म्हणून शिक्षक-पालक संघ कामकाज बघतो. विद्यार्थी वाहतुकीसाठी कोणती बस नेमायची, ती योग्य वेळेत येते का, हे पाहण्याचे काम परिवहन समितीच्या माध्यमातून केले जाते. (प्रतिनिधी)