शाळांच्या तारखांबाबत शाळा, व्हायरल मेसेजमुळे पालकांमध्ये संभ्रमावस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 02:44 AM2018-06-14T02:44:05+5:302018-06-14T02:44:05+5:30
उन्हाळ्याची सुटी संपल्याने शुक्रवारपासून (दि. १५) शाळा सुरू होणार आहेत़ पण शनिवारी आणि रविवारी पुन्हा सुटी आली आहे़ त्यामुळे शाळा सोमवारपासून (दि. १८) सुरू होणार आहेत,
पिंपरी - उन्हाळ्याची सुटी संपल्याने शुक्रवारपासून (दि. १५) शाळा सुरू होणार आहेत़ पण शनिवारी आणि रविवारी पुन्हा सुटी आली आहे़ त्यामुळे शाळा सोमवारपासून (दि. १८) सुरू होणार आहेत, असा मेसेज दिवसभर सोशल मीडियावरून फिरत होता. शाळांना सुटी असल्यामुळे पालकही संभ्रमावस्थेत होते. ‘शाळां’च्या तारखा बदलण्याची कोणी ‘शाळा’ केली याबाबत मात्र शहरात दिवसभर चर्चा सुरू होती.
शहरात नोकरी आणि व्यवसायानिमित्त राज्यातील विविध भागांतील नागरिक वास्तव्यास आहेत. मुलांना सुटी लागली अनेक जण आपल्या गावाकडे जातात. शाळांचे नियम कडक असल्यामुळे पालकांना शाळा सुरू असताना गावाकडे जाता येत नाही. यंदा शाळा १५ जूनपासून सुरू होणार असल्याचे शाळांनी सांगितले होते. परंतु पुन्हा शनिवार आणि रविवार सुटी आल्यामुळे शाळा सोमवारपासून सुरू करा, असा पालकांचा आग्रह होता. त्यामुळे काही जणांनी शाळा १८ जूनपासून सुरू होणार आहेत, असे मेसेज पाठिवण्यास सुरुवात केली. सोशल मीडियावर याची चर्चा झाली. पण अधिकृत माहिती नसल्यामुळे पालक संभ्रम अवस्थेत आहेत. अनेकांनी शाळांची संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण सुटीमुळे शाळांची संपर्क होऊ शकला नाही.
याबाबत महापालिकेच्या शिक्षण विभागाशी संपर्क साधला असता, मराठी माध्यामांच्या शाळा १५ जूनपासून सुरू होणार आहेत. तर उर्दू माध्यामांच्या शाळा १८ जूनपासून सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले.
ओढ गावाकडची, भीती दंडाची!
अनेक नागरिक अनेक दिवसांनी आपल्या जन्मभूमीकडे गेले आहेत. तेथील मुक्काम दोन दिवस वाढेल, अशी आशा त्यांना होती. त्याचा त्यांना आनंदही झाला होता. पण पहिल्या दिवशी विद्यार्थी शाळेत हजर नसेल तर त्याला दंड करण्याची खासगी शाळांची पद्धत आहे. त्यामुळे ओढ गावकडची आणि भीती दंडाची अशी त्यांची परिस्थिती झाली आहे.