महापालिकेची शाळा ठरली अव्वल, शाळेला मिळाले आयएसओ गुणवत्ता प्रमाणपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 01:28 AM2018-06-18T01:28:07+5:302018-06-18T01:28:07+5:30
महापालिकेचा शाळांचा दर्जा वाढला आहे. अजंठानगर येथील महापालिकेच्या शाळेने राज्य शासनाच्या २४ निकषांची पूर्तता केल्याने आयएसओ गुणवत्ता प्रमाणपत्र मिळविले आहे.
पिंपरी : महापालिकेचा शाळांचा दर्जा वाढला आहे. अजंठानगर येथील महापालिकेच्या शाळेने राज्य शासनाच्या २४ निकषांची पूर्तता केल्याने आयएसओ गुणवत्ता प्रमाणपत्र मिळविले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळाच्या प्राथमिक शाळा ८७ असून, माध्यमिक विद्यालये १९ आहेत. पटसंख्येचा प्रश्न गाजत असताना शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न होत आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा टक्का वाढत चालला आहे. निगडीच्या अजंठानगर येथील माता रमाबाई आंबेडकर कन्या शाळा आणि माता रमाबाई आंबेडकर मुलांची शाळा या दोन्ही शाळांत पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण दिले जाते. शाळांच्या आयएसओ मानांकनासाठी शासनाने निकष निर्धारित केले आहेत. हे निकष पूर्ण करणारी शाळाच आयएसओ गुणांकनासाठी पात्र ठरते. त्यानुसार संबंधित शाळने निकष पूर्ण केले आहेत. त्यामध्ये बोलक्या भिंती, गांडुळखत प्रकल्प, विद्यार्थ्यांसाठी सुविधा, दहा भौतिक सुविधा, गुणवत्तावाढ, विद्यार्थ्यांची उपस्थिती, सौरऊर्जा प्रकल्प, औषधी वनस्पती प्रकल्प, संगणक लॅब, डिजिटल वर्गखोल्या, प्रयोगशाळा, वर्गातील फळे, पाणीपुरवठा, स्वच्छता, मुलांना लिहिता-वाचता येणे आदी निकष घातले आहेत. यासह मागच्या तीन वर्षांतील विद्यार्थ्यांची प्रगती, उपस्थिती आणि पटसंख्या, शाळेचे रेकॉर्ड, फायलींची ठेवण आदी निकष तपासले होते. शाळेमध्ये ई-लर्निंग, वाचन संस्कार प्रकल्प, रेन वॉटर हार्वेस्टिंग, गांडुळ खत प्रकल्प, पर्यावरण- कुंडी प्रकल्प व औषधी वनस्पतींचे टेरेस गार्डन असे उपक्रम राबविले जातात.
मुख्याध्यापिका रजनी सईद म्हणाल्या, ‘‘शाळेमध्ये ४०० मुली व ४०० मुले अशी एकूण ८०० विद्यार्थ्यांची ही शाळा आहे. कन्या शाळेकडे १० शिक्षक कार्यरत आहे. दिवसाआड योगाचे क्लास
घेण्यात येतात. राज्य शासनाच्या निकषांची पूर्तता शाळेने केल्याने यश मिळाले आहे.’’
मंडळाचे सहायक प्रशासन अधिकारी पराग मुंडे म्हणाले, ‘‘पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या १० कलमी कार्यक्रमात अजंठानगर शाळेने द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले आहे. अजंठानगर येथील राज्य शासनाच्या निकषांची पूर्तता केली. एकही निकष अपूर्ण असेल, तर शाळेची निवड होत नाही. आज रोजी मनपाच्या तीन शाळांना आयएसओ दर्जा मिळालेला आहे. दिवसेंदिवस सर्वच प्राथमिक शाळांतील शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याकडे कल आहे. शहरात महापालिकेच्या अन्य जवळपास २० शाळा आयएसओ मानांकनास पात्र ठरतील.’’