पालकांच्या विसंवादामुळे शालेय विद्यार्थ्यांचे पलायन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2018 03:15 AM2018-12-09T03:15:47+5:302018-12-09T03:18:02+5:30

कुटुंबात आईवडिलांचे वाद; शहरात वाढल्या घरातून पळून जाण्याच्या घटना

School students flee from parental discretion | पालकांच्या विसंवादामुळे शालेय विद्यार्थ्यांचे पलायन

पालकांच्या विसंवादामुळे शालेय विद्यार्थ्यांचे पलायन

Next

- प्रकाश गायकर 

पिंपरी : कुटुंबात आईवडिलांचे एकमेकांशी प्रेमाचे व सलोख्याचे संबंध नसल्याने मुलांच्या जीवनावर विपरीत परिणाम होत आहे. शालेय वयातील विद्यार्थी वेगळ्या मार्गावर जात असल्याचे चित्र पाहयला मिळत आहे. आईवडिलांना मुलांसाठी वेळ नसणे, त्यांच्याशी मैत्रीपूर्ण नाते नाही. मुले आणि पालकांमधील संवाद हरवत चालला आहे. घरात प्रेमळ व सकारात्मक वातावरण नसल्याने मुले भरकटताना दिसत आहेत. त्यातून नशेच्या आहारी व मौजमस्ती करण्यात अल्पवयीन मुले दंग होतात. 

घरात आई-बाबा एखादा शब्द बोलले तरी ही मुले टोकाचा निर्णय घेऊन घराबाहेर पडतात. उद्योगनगरीत मुले व मुली घरातून न सांगता पलायन करण्याच्या घटना वाढत आहेत. अलीकडच्या काळात आईवडील दोघांना कामासाठी घराबाहेर पडावे लागते. त्यामुळे कुटुंबात मुलांना देण्यासाठी वेळ नसतो. त्यामुळे अल्पवयीन मुलांचे योग्य संगोपनाकडे दुर्लक्ष होते.

त्यातून ईर्ष्या, द्वेष वाढत जातात. एखादी गोष्ट त्याच्याकडे आहे मग माझ्याकडे का नाही, असे प्रश्न मुलांना वेगळ्या मार्गावर घेऊन जात आहेत. त्यातून मग आईवडिलांसोबत छोट्या-छोट्या गोष्टींसाठी भांडणे करतात. कोणी समजून घेण्यासाठी नसल्याने एकलकोंडी होतात.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ही मुले सराईतपणे करीत आहेत. स्मार्ट फोनमधील विविध अ‍ॅप्समुळे सोयीसुविधा निर्माण झाल्या आहेत. मात्र आता हा स्मार्ट फोनच पालकांच्या चिंतेत भर टाकत आहे.

कोवळ्या वयात पडतात प्रेमात
शाळा, महाविद्यालयात झालेली ओळख स्मार्ट फोनमुळे अधिक घट्ट होते. लेटनाईट चॅटिंग करणे, विविध पोझमधील फोटो अपलोड करणे, मिनिटाला स्टेटस बदलणे हे मुलांना नवीन नाही. घरात मुलांना सकारात्मक प्रेम मिळत नाही. त्यामुळे कोवळ्या वयात मुले-मुली एकमेकांमध्ये जास्त जवळीक साधून प्रेमात पडतात. प्रपोज करणे, ब्रेक अप होणे हे शब्द शाळा, महाविद्यालयाच्या आवारात नित्याने ऐकायला मिळतात. विशिष्ट वयात प्रेमात पडल्यावर पालकही विरोध करणार नाहीत, मात्र कोवळ्या वयात प्रेमात पडलेल्या मुलांना पाहून घरचेही धास्तावले आहेत.

आई-बाबांनाच धरतात वेठीस
मुलांच्या मनासारखे झाले नाही तर मुले आई-बाबांनाच वेठीस धरतात. गेल्या आठवड्यात तीन शाळकरी मुली शाळेत जातो असे सांगून घराबाहेर पडल्या. मात्र रात्री उशिरापर्यंत त्या घरी परतल्या नाहीत. तेव्हा घरच्यांनी पोलिसांत तक्रार दिली आणि त्यानंतर पोलीस व पालकांची शोधाशोध सुरू झाली. मुंबईला जाण्याच्या तयारीत असताना या मुलींना लोणावळा स्थानकातून ताब्यात घेण्यात आले. केवळ सहल म्हणून त्या घराबाहेर पडल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

सुसंवादाची योग्य वेळ जाणावी
आपले पाल्य अबोल होणे, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, फोनवर सतत रमलेले असल्यास, अनेक भेटवस्तू घरात दिसू लागल्यास, वारंवार शाळा कॉलेज बुडवत असल्यास, सिनेमा हॉटेल येथील फेऱ्या वाढल्या असतील. तसेच चेहºयावर अतिभीती अथवा आनंद दिसू लागला असेल, मित्र परिवारातील एखाद्या मुलाकडे ऐपतीपेक्षा महागड्या गाड्या, कपडे, फोन दिसत असल्यास आपल्या लेकीला विश्वासात घेऊन अत्यंत मायेने तिच्याशी या विषयी संवाद सुरू करायला हवा.

घरामध्ये एकेरी संवाद नको. संवाद दोन्ही बाजूने असला तरच अपेक्षित आशय एकमेकांपर्यंत पोहोचतो. मुलांना खूप काही सांगायचे असते. परंतु त्यांना ही संधी दिली नाही तर ओघाने त्यांचे ऐकणारे त्यांना प्रिय वाटू लागतात. काही विषय वर्ज्य असले तरीही आपल्या पाल्यासोबत निसंकोचपणे चर्चा करावी. प्रेम भावनेचा आधारे जर समाजकंटक ठरवून, सूड भावनेने मुलींना प्रेमाचे जाळ्यात अडकवत असतील, तर पालकांनी गांभीर्याने विचार करावा. - स्मिता कुलकर्णी, समुपदेशक

Web Title: School students flee from parental discretion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.