झोपडपट्टी परिसरातील शाळा बनली ‘हायफाय’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 12:48 AM2018-08-18T00:48:55+5:302018-08-18T00:49:45+5:30
महापालिकेच्या शाळांचे रूप हळूहळू बदलू लागले आहे. शाळा डिजिटल होऊन आयएसओ होत आहेत. अशाच प्रकारे अजिंठानगर येथील माता रमाबाई भीमराव आंबेडकर शाळेचे रूप बदलले आहे.
- प्रकाश गायकर
पिंपरी - महापालिकेच्या शाळांचे रूप हळूहळू बदलू लागले आहे. शाळा डिजिटल होऊन आयएसओ होत आहेत. अशाच प्रकारे अजिंठानगर येथील माता रमाबाई भीमराव आंबेडकर शाळेचे रूप बदलले आहे. झोपडपट्टी भागातील या शाळेने विविध पुरस्कार पटकावत आदर्श शाळा होण्याचा मान मिळवला आहे.
शाळेमध्ये सुमारे ६५० पटसंख्या आहे. शाळेच्या प्रवेशद्वारापासूनच शाळेतील स्वच्छता आणि प्रसन्न वातावरणाचा अनुभव येतो. रेन हार्वेस्टिंग सिस्टीम, गांडुळखत प्रकल्प, औैषधी वनस्पती लागवड, कुंडी प्रकल्प असे पर्यावरणपूरक प्रकल्प राबविले जातात. शाळा डिजिटल होण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते, पालक, शिक्षक व विविध संस्थांनी विशेष मदत केली. जानकीदेवी बजाज यांनी ई-लर्निंगसाठी १० संगणक शाळेला दिले. शाळेमध्ये वाचनालय, प्रयोग शाळा, ई-लर्निंग विभाग व विविध खेळाचे साहित्य आहे. त्यामुळे पटसंख्या वाढली आहे. शाळेमध्ये ई-लर्निंगच्या माध्यमातून मुलांना संगणकीय ज्ञान दिले जाते. चित्रफितीच्या माध्यमातून मुलांना शिक्षणाची गोडी निर्माण होते. शाळेमध्ये सुसज्ज असे वाचनालय आहे़ त्यामुळे वाचनाची आवड मुलांमध्ये निर्माण होते. विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाप्रमाणेच संस्कारांचे धडे दिले जातात. मुलांनी बाल गुन्हेगारीपासून दूर राहावे यासाठी पोलिसांकडून समुपदेशनाचे कार्यक्रम घेतले जातात.
मुलांचे संख्याज्ञान वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. मुलांनी बाल गुन्हेगारीपासून दूर राहावे यासाठी पोलिसांकडून समुपदेशनाचे कार्यक्रम घेतले जातात. व्यसनाधिनतेपासून कसे दूर राहावे यासाठी शिबिरे घेतली जातात. इतर खासगी शाळेतील विद्यार्थी प्रवेशासाठी प्रतीक्षा यादीत असतात. अशाप्रकारे महापालिकेच्या प्रत्येक शाळांनी डिजिटलसाठी प्रयत्न केले तर मराठी माध्यमाच्या मुलांचा टक्का वाढेल. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढून एक संस्कारक्षम व डिजिटल युगात वावरणारी पिढी निर्माण होईल.
स्वच्छतेसाठी पुढाकार
शाळेचा परिसर चांगला राहावा यासाठी सुरक्षारक्षकापासून ते मुख्याध्यापकापर्यंत सगळेच काळजी घेतात. सुरक्षारक्षक गोविंद ठोकळ यांनी वृक्ष संवर्धनासाठी उन्हाळ्यात सुटी न घेता झाडांचे रक्षण केले. शाळेमधील मुख्याध्यापिका रजनी सैद यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योजना राबविण्यासाठी शिक्षक सतीश पाटील नेहमी कार्यरत असतात. पर्यावरणाचे प्रकल्प राबविण्यासाठी शिक्षिका वर्षा सावंत हे प्रयत्न करतात.
शाळेमध्ये विविध उपक्रम राबविले जातात. विविध सोयीसुविधा असल्यामुळे पटसंख्या वाढली आहे. अनेक खासगी शाळांचे विद्यार्थी या शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असतात. सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी शाळा डिजिटल होण्यासाठी अपार कष्ट घेतले आहेत.
- रजनी सैद, मुख्याध्यापिका
शाळा डिजिटल करण्यासाठी अनेक संस्थानी आमच्या पाठीवर हात ठेवला़ त्यामुळे आम्ही या भागामध्ये एक आदर्श शाळा निर्माण करू शकलो. सर्व शिक्षकांचा यामध्ये मोलाचा वाटा आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक कर्मचारी जीव ओतून शाळा सुधारणेसाठी प्रयत्न करतो.
- सतीश पाटील, शिक्षक.