सायन्स सिटी पिंपरी-चिंचवडमध्येच होणार, प्रकल्पाबाबत मुख्यमत्र्यांसोबत बैठक- दिपक केसरकर
By विश्वास मोरे | Published: September 7, 2022 03:22 PM2022-09-07T15:22:34+5:302022-09-07T15:26:22+5:30
केसरकर यांनी बैठकीत सायन्स सिटी प्रकल्पांचा आढावा घेतला
पिंपरी : पुणे-मुुंबई महामार्गावरील महापालिकेच्या वतीने उभारलेल्या विज्ञान केंद्रास राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी बुधवारी सकाळी भेट दिली. बैठकीत सायन्स सिटी प्रकल्पांचा आढावा घेतला. ‘‘केंद्र आणि राज्य सरकारच्या समवेत सायन्स सिटीबाबत तातडीने बैठक घेण्यात येईल, तसेच सायन्स सिटी पिंपरी-चिंचवड शहरात होणार आहे, अशी माहिती केसरकर यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या विज्ञान केंद्रास शिक्षणमंत्र्यांनी भेट दिली. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, युवक कल्याण आणि क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, माजी उपमहापौर केशव घोळवे, माजी प्रभागअध्यक्षा अनुराधा गोरखे, प्रकल्पाचे मुख्याधिकारी प्रवीण तुपे आदी उपस्थित होते.
सायन्स सिटीचे सादरीकरण
सुरूवातीला केसरकर यांनी विज्ञान केंद्राची पाहणी केली. त्यानंतर तुपे यांनी विज्ञान केंद्र आणि सायन्स सिटीचे सादरीकरण केले. सायन्य सिटीची सद्यस्थिती त्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरात जागा उपलब्ध आहे का? याबाबत माहिती घेतली. प्रकल्पांची वैशिष्टे आणि मध्यवर्ती ठिकाणांबाबत माहिती घेतली. यावेळी क्रीडा आयुक्त दिवसे म्हणाले, ‘‘तीन जागांचा या प्रकल्पांसाठी उपयोग केला जाऊ शकतो. एक जागा ऑटो क्लस्टर समोरील, दुसरी मोशीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र आणि निघोजे येथील जागेत हे केंद्र उभारले जाऊ शकते.’’
त्यावर खासदार बारणे आणि खापरे यांनी हे केंद्र शहरात व्हायला हवे, महापालिकेकडे जागा उपलब्ध आहे. तिथेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे केंद्र उभारले जावे, अशी आग्रही भूमिका मांडली. तसेच जितेंद्र वाघ यांनी विज्ञान प्रकल्प आणि ऑटो क्लस्टर परिसरातील जागेचा विचार केला जाऊ शकतो. तसेच शेजारीच महापालिकेची नवीन इमारत प्रस्तावित आहे. त्याशेजारीच सिटी सेंटरचे आरक्षण आहे, सायन्स सिटीबाबत प्रकल्पांचा विचार केला जात असताना आरक्षण बदलावे लागणार आहे, याबाबत शासनस्तरावर निर्णय घ्यावा लागणार आहे, अशी भूमिका वाघ यांनी मांडली.
त्यानंतर सायन्स सिटी प्रकल्पाबाबत नगररचना विभागाशी चर्चा करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेश तातडीची बैठक घेण्यात यावी, हा प्रकल्प पिंपरी-चिंचवड मध्ये उभारला जाईल, असे यावेळी केसरकर यांनी सांगितले. तसेच महापालिकेच्या नगरविकास विभागाला कार्यवाही करण्याबाबत सूचना केल्या.