वाहने चोरी करून स्क्रॅप करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; भंगार व्यावसायिकासह तिघांना बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 03:29 PM2021-04-13T15:29:05+5:302021-04-13T15:31:40+5:30

१८ लाख ७० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

Scrap of theft vehicles gang exposed, 3 person arrested including a scrap dealer | वाहने चोरी करून स्क्रॅप करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; भंगार व्यावसायिकासह तिघांना बेड्या

वाहने चोरी करून स्क्रॅप करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; भंगार व्यावसायिकासह तिघांना बेड्या

Next

पिंपरी : दुचाकी-चारचाकीसह अवजड वाहनांच्या चोरीचे प्रकार सर्रास सुरू आहेत. अशा वाहनांची चोरी करून भंगाराच्या दुकानात त्याचे स्क्रॅप करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. याप्रकरणी भंगार व्यावसायिकासह तीन जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन डंपर, इंजिन, इंजिनचे पार्ट, एक दुचाकी व चारचाकी, असा १८ लाख ७० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. हिंजवडी पोलिसांनी ही कारवाई केली. 

अक्रम आयुब शेख (वय ४३, रा. जाधववाडी, चिखली), महेश मारुती फंड (वय २३, रा. आळंदी देवाची, ता. खेड), सिद्धप्पा बसप्पा दोडमणी उर्फ धोत्रे (वय २७, रा. कुसाळकर चौक, जनवाडी, पुणे), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह राजेश नागापुरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, बावधन येथून २२ मार्च २०२१ रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आरोपीने डंपर चोरून नेला होता. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशाच पद्धतीने वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून देखील डंपर चोरी झाल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी डंपरच्या मालकाशी संपर्क साधला. चोरी झालेल्या डंपरला जीपीएस असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार शोध घेतला असता चोरी झालेला डंपर हा चिखली कुदळवाडी परिसरातील भंगार दुकानांमध्ये गेलेला असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून भंगार दुकानाची माहिती घेतली असता ए. एस. एंटरप्राइजेस या भंगाराच्या दुकानात चोरीचा डंपर असल्याचे समोर आले. त्यावरून भंगार दुकानाचा मालक आरोपी शेख याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

चोरीचा डंपर आरोपी महेश फड, सिद्धप्पा व नागापुरे यांनी आणून दिल्याचे आरोपी शेख याने पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी आरोपी फड आणि सिद्धप्पा यांना अटक केली. पुणे आणि पिंपरी-चिंचवड भागातील एकूण १६ लाख ५० हजार रुपये किमतीचे एकूण सहा डंपर चोरीस गेले होते. अटक केलेल्या आरोपींकडून दोन डंपर इंजिन इंजिन चे पार्ट एक दुचाकी व चारचाकी वाहन असा चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. अलंकार, वारजे माळवाडी, भारती विद्यापीठ या पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक तर लोणीकंद पोलीस ठाण्यातील दोन गुन्हे आरोपींकडून उघडकीस आले आहेत.

Web Title: Scrap of theft vehicles gang exposed, 3 person arrested including a scrap dealer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.