थकबाकीदारांच्या मिळकती सील
By admin | Published: March 27, 2017 03:05 AM2017-03-27T03:05:20+5:302017-03-27T03:05:20+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेने मिळकतकर थकविणाऱ्यांविरोधात जप्तीची मोहीम राबविली आहे. मिळकतकराची
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने मिळकतकर थकविणाऱ्यांविरोधात जप्तीची मोहीम राबविली आहे. मिळकतकराची थकबाकी असलेल्या एकूण दहा मिळकतींवर करसंकलन विभागातर्फे मिळकत जप्तीची कारवाई केली.
राज्य शासनाचा आदेश मिळताच मिळकतकर विभागाने कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. महापालिका क्षेत्रात करसंकलन विभागाकडे चार लाख पन्नास हजार मिळकतींची नोंद असून, त्यापैकी तीन लाख सहा हजार ८९८ मिळकतधारकांनी ३७१ कोटींचा भरणा केला आहे. करसंकलन विभागामार्फत दिनांक सात मार्चअखेर ज्या मिळकतधारकांकडे दहा हजार रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या ६५ हजार नोटिसा बजाविण्यात आल्या असून, सुमारे ४२ हजार मिळकतधारकांना जप्तीपूर्वीच्या नोटिसा बजावल्या आहेत. त्यानुसार कारवाई सुरू झाली आहे. ही कारवाई करसंकलन विभागाचे सह आयुक्त दिलीप गावडे, प्रशासन अधिकारी संदीप खोत यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कारवाई केली. निगडी विभागाकडील पाच मोबाइल टॉवरचे ३२ लाखांची थकबाकी असलेल्या बिगरनिवासी मिळकतीवर पथकाने मिळकती जप्त करणेची कारवाई केली. यापैकी चार लाखांचा भरणा डीडीद्वारे करण्यात आला. सांगवी विभागीय कार्यालयाकडील पिंपळे निलख येथील साडेअकरा लाख, चिखली विभागाकडील बिगरनिवासी मिळकती थकबाकीतून ८ लाख रुपये कर थकबाकीचे धनादेश जप्ती कारवाईचे वेळी मिळकतधारकांनी अधिकाऱ्यांकडे सुपूर्त केले.(प्रतिनिधी)