राष्ट्रवादीला उमेदवाराचा शोध
By admin | Published: October 15, 2016 03:14 AM2016-10-15T03:14:41+5:302016-10-15T03:14:41+5:30
मोशी गावठाण, चऱ्होली, डुडुळगाव अशा तीन गावांचा परिसर मिळून प्रभाग क्रमांक तीन तयार झाला आहे. ग्रामीण भागांचा मोठ्या प्रमाणावर समावेश
पिंपरी : मोशी गावठाण, चऱ्होली, डुडुळगाव अशा तीन गावांचा परिसर मिळून प्रभाग क्रमांक तीन तयार झाला आहे. ग्रामीण भागांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. आरक्षणांचा रखडलेला विकास ही येथील प्रमुख समस्या आहे. नव्याने विकसित झालेल्या भागात मध्यमवर्गीय आणि उच्चभ्रू सोसायट्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या प्रभागात दोन जागा सर्वसाधारण आणि ओबीसीसाठी दोन जागा आरक्षित आहेत. खुल्या आणि ओबीसी गटात मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.
महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक सहा म्हणजेच मोशी प्रभाग आणि प्रभाग क्रमांक सात चऱ्होली मिळून यंदाचा प्रभाग क्रमांक तीन झाला आहे. इंद्रायणी नदी आणि प्रमुख रस्त्यांचा आधार घेऊन नवीन प्रभाग झाला आहे. मोशी जकात नाक्यासमोरील पुलापासून इंद्रायणी नदीने आळंदीची हद्द, देहूगाव नाका, चऱ्होली गावठाण, निरगुडी आणि पुढे लोहगाव आणि लष्करी हद्दीने पुणे-आळंदी रस्त्यापर्यंत, पुढे संत ज्ञानेश्वरनगर, दिघी, मॅगझिन हद्दीने गंधर्वनगरी, केंद्रीय विहार, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची विरुद्ध बाजूने मोशी गावठाण, पुढे मोशी नाक्यापर्यंतचा भाग या भागात जोडला आहे. नकाशात भौगोलिकदृष्ट्या हा प्रभाग मोठा दिसतो. याचे प्रमुख कारण समाविष्ट गावांचा भाग अधिक असल्याने मोकळ्या जागा अधिक आहेत.
गेल्या वेळी मोशी प्रभागातून राष्ट्रवादीच्या मंदा आल्हाट आणि शिवसेनेचे धनंजय आल्हाट आणि चऱ्होली प्रभागातून राष्ट्रवादीकडून विनया तापकीर आणि नितीन काळजे निवडून आले होते. नवीन प्रभागरचनेत मोशी गावाचे दोन भागांत विभाजन केले आहे. मात्र, चऱ्होली आणि डुडुळगाव या गावांचा पूर्णपणे समावेश केला आहे. मोशी आणि चऱ्होली परिसरात ओबीसी मतदारांची संख्या अधिक आहे. मंदा आल्हाट आणि धनंजय आल्हाट या दोन्ही नगरसेवकांना प्रभाग दोन आणि तीन अशा दोन्ही ठिकाणी संधी आहे. तसेच सर्वसाधारणसाठी दोन जागा राखीव असल्याने चऱ्होलीच्या दोन्ही नगरसेवकांना संधी आहे.
गावांचा परिसर अधिक असला, तरी नवीन विकसित झालेल्या सोसायट्यांची संख्या अधिक झाली आहे. गाववाल्यांपेक्षा बाहेरून आलेल्यांची संख्या अधिक झाली आहे. मध्यमवर्गीय उच्चभ्रूंचे
मतदान निर्णायक ठरणार आहे. समाविष्ट गावांत अजूनही
विकासाची गंगा पोहोचलेली नाही. रस्ते, शाळा, उद्याने आदी आरक्षणे विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या वेळी या प्रभागातून राष्ट्रवादीला तीन आणि शिवसेनेला एक जागा मिळाली होती.
या भागात विद्यमान आमदार महेश लांडगे आणि माजी आमदार विलास लांडे यांचे वर्चस्व आहे. नितीन काळजे हे आमदार लांडगेंच्या संपर्कात आहेत. लांडगे भाजपाच्या वाटेवर आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला येथून नवीन उमेदवार शोधावा लागणार आहेत. येथील जागा ओबीसी आणि सर्वसाधारणसाठी राखीव असल्याने उमेदवारासाठी सर्वच पक्षांत इच्छुकांची संख्या अधिक असणार आहे. (प्रतिनिधी)