नदीत बुडालेल्या तरुणाच्या शोधकार्यात जलपर्णीचा अडथळा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2019 09:00 PM2019-07-11T21:00:39+5:302019-07-11T21:26:21+5:30
पिंपळे गुरव येथे पवना नदीपात्रात उडी मारल्याने बुडालेला तरुण ३६ तास शोध घेऊनही सापडला नाही. मंगळवारी (दि. ९) दुपारी साडेचारच्या सुमारास तरुण बुडाला होता. त्या दिवशी अग्निशामक दलाच्या दोन पथकांनी शोध घेतला.
सांगवी : पिंपळे गुरव येथे पवना नदीपात्रात उडी मारल्याने बुडालेला तरुण ३६ तास शोध घेऊनही सापडला नाही. मंगळवारी (दि. ९) दुपारी साडेचारच्या सुमारास तरुण बुडाला होता. त्या दिवशी अग्निशामक दलाच्या दोन पथकांनी शोध घेतला. बुधवारी (दि. १०) सकाळपासून व्हिक्टीम लोकेशन कॅमेरा अर्थात आधुनिक पध्दतीच्या कॅमेºयाचा वापर करण्यात आला. नदीपात्रात पाण्याच्या तळाशी हा कॅ मेरा टाकून शोध घेण्यात आला. मात शोध लागला नाही. त्यासाठी गुरुवारी पुन्हा ड्रोन कॅमेºयाचा वापर करण्यात आला. मात्र तरीही तरुणाचा शोध लागला नाही. जोरदार पाऊस झाल्याने नदीतील पाणी पातळी वाढली. त्यामुळे पाण्याचा प्रवाह वेगात होता. तसेच नदीपात्रातील जलपर्णीमुळे देखील शोधकार्यात बाधा आली.
शुभम येडे (वय २३, रा. राहटणी) असे नदीत बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. शुभम याचा मंगळवार सायंकाळपासून शोध घेण्यात येत आहे. मात्र ३६ तास उलटूनही शोध लागला नाही. गुरुवारी सायंकाळी पुरेसा उजेड नसल्याने शोधकार्य थांबवण्यात आले. महापालिका आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा व अग्निशामक दलाने शोधकार्यात व्हिक्टीम लोकेशन व ड्रोन कॅमेरा वापरला. महापालिकेच्या अग्निशामक दलाचे कर्मचारी व आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी तसेच अधिकारी घटनास्थळी दिवसभर तळ ठोकून होते.
पिंपळे गुरव येथे नदीतील घाट परिसरात मंगळवारी व बुधवारी शोधकार्य सुरू होते. मात्र दापोडी येथील हॅरीस पूल व बोपोडीला जोडणाºया पुलाच्या मध्यवर्ती भागात नदीपात्रात कोणीतरी वाहून जाताना काही लोकांनी सांगितले. त्यानुसार गुरुवारी दुपारी दोनपासून पिंपळे गुरव येथील शोधकार्यात गुंतलेली यंत्रणा दापोडी येथे हलवण्यात आली. सायंकाळी सातपर्यंत दापोडी येथे नदीपात्रात शोधकार्य सुरू होते. परंतु शुभम याचा शोध लागला नाही. दरम्यान आधुनिक तंत्रांचा वापर करीत दापोडी येथे ड्रोन कॅमेºयाच्या साह्याने शोध घेण्यात आला. मात्र नदीत फोफावलेल्या जलपर्णीमुळे त्यात अपयश आले. नागरिकांनी येथे गर्दी केली होती. शुभम याच्या नातेवाईकांचीही तीन दिवसांपासून घालमेल होत आहे.
महापालिकेच्या अग्निशामक दलाचे मुख्य अधिकारी किरण गावडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बाहीवाल, आपत्ती व्यवस्थापनचे उप अधिकारी अरविंद गुळी, शांताराम काटे, उपअभियंता जयदीप पवार, आशुतोष हरनवळ, रमेश गायकवाड आणि अग्निशामक दलाचे कर्मचारी यांनी शोधकार्यात सहभाग घेतला होता.