दुसऱ्या लॉकडाऊनने कालवले ‘त्यांच्या’ वैवाहिक जीवनात विष! एकाच घरात पूर्ण वेळ एकत्र राहूनही पती-पत्नीकडे एकमेकांसाठी नाही वेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 09:35 AM2021-06-08T09:35:56+5:302021-06-08T09:37:20+5:30
पोलिसांचा भरोसा सेल कडे २०३ तक्रारी
नारायण बडगुजर
पिंपरी : लॉकडाऊनमध्ये संपूर्ण कुटुंबाला घरामध्ये रहावे लागले. त्यामुळे किरकोळ कारणावरून विसंवाद होऊन वादाचे प्रकार घडले. दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये याचे प्रमाण जास्त आहे. यात काही पती-पत्नीमंधील टोकाचा वाद झाल्याने त्यांनी थेट पोलिसांकडे धाव घेतली. एक प्रकारे त्यांच्या वैवाहिक जीवनात विष कालवल्याचा प्रकार या दिवसांमध्ये झाल्याचे दिसून येते.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत असलेल्या भरोसा सेलकडे पती-पत्नींकडून तक्रारींचे अर्ज दाखल केले जातात. कौटुंबिक वाद होऊन नात्यांमध्ये कटुता निर्माण होते. एरवी कामानिमित्त जास्तीतजास्त घराबाहेर राहणारे पती-पत्नी तसेच कुटुंबातील इतर सदस्य लॉकडाऊनमध्ये पूर्णवेळ एकत्र आले. यातून काही आर्थिक प्रश्न निर्माण झाले. तसेच घरातील कामे कोणी करायची, किती करायची, स्वयंपाक, चहा, कॉफी, नाश्ता अशा किरकोळ कारणांवरून सुरू झालेली भांडणे विकोपाला जात असल्याचे दिसून येते. सासू-सूनेमध्ये बेबनाव हे देखील वादाचे कारण ठरत आहे. अशा प्रकरणांमध्ये दाखल झालेल्या अर्जांबाबत कार्यवाही करून पोलिसांच्या भरोसा सेलकडून समझोता घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले जातत. त्यासाठी पती-पत्नी तसेच त्यांच्या घरच्यांचे समुपदेशन केले जाते. त्यानंतरही समझोता न झाल्यास संबंधित पती-पत्नी पुढील कायदेशीर मार्ग अवलंबतात.
५२ पती-पत्नींचे भांडण सोडविले
लॉकडाऊन काळात भरोसा सेलने ५२ पती-पत्नींमध्ये समझोता घडवून आणला. मात्र त्यासाठी मोठी कसरत करावी लागली. लॉकडाऊन तसेच कोरोना महामारीमुळे अर्जदार तसेच इतर संबंधित लोक समुपदेशनसाठी येण्याचे टाळतात. तक्रारदारांनी अर्ज केल्यानंतर प्रत्यक्ष भेटण्यास तयार होत नसल्याचे प्रकार घडत आहेत. त्यांना विश्वासात घेऊन निर्बंधांचे पालन करून भरोसा सेलला समुपदेशन करावे लागले.
मोबाइल, सोशल मीडिया हेच कारण
लॉकडाऊनमुळे पूर्ण वेळ एकत्र राहात असले तरी त्यातील जास्तीतजास्त वेळ मोबाइल व सोशल मीडियाचा वापर करून घरातील इतर सदस्यांना वेळ देत नसल्याचे कारण तक्रार पती-पत्नींकडून अर्जात नमूद केले आहे. सतत ऑनलाइन राहणे, वर्क फ्राॅम होम असूनही ऑनलाइन कॉलमध्ये जास्त वेळ गुंतून राहणे, अशी कारणे सांगून काही महिलांनी त्यांच्या पतीची तक्रार केली. यात काही पुरुषांनीही त्यांच्या पत्नीबाबत अशाच तक्रारी केल्या. त्यामुळे एकत्र राहूनही एकमेकांना पूर्ण वेळ देऊ न शकल्याने वाद झाले.
पैसा हेच कारण
लॉकडाऊन काळात अनेक हातांचे काम गेले. त्यामुळे अनेकांचा रोजगार गेला. परिणामी आर्थिक विवंचना होऊन कुटुंब अडचणीत आले. यात काही जणांना त्यांच्या सवयी, राहणीमान बदलणे अवघड होत आहे. त्यामुळे चिडचिड वाढून पती-पत्नीमध्ये वादाचे प्रकार झाले. पैसा नसणे, हेच कारण सांगत त्यांच्याकडून विभक्त होण्याचा निर्णय घेण्यात आला.
नातेवाईकांचा अनावश्यक हस्तक्षेप
लॉकडाऊनमुळे सर्व कुटुंब एकत्र आल्याने त्यांच्यातील उणीवा देखील प्रकर्षाने एकमेकांच्या समोर आल्या. सुनेला स्वयंपाक येत नाही, वेळेवर चहा, नाश्ता दिला नाही, अशी कारणे सांगून सासू-सासऱ्यांकडून जाच होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. तसेच सासरचे मोबाइलवर बोलू देत नाहीत, पगाराचे पैसै मागतात, अशी कारणे सुनांकडून तक्ररी करण्यात आला.
भरोसा सेलकडून मार्च २०२० पासून आलेल्या एकूण तक्रारी - २०३
दुसऱ्या लॉकडाऊनच्या काळात आलेल्या तक्रारी - ५९