सुरक्षा अभियान, तरीही महिला असुरक्षितच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 02:19 AM2018-08-21T02:19:41+5:302018-08-21T02:20:00+5:30
हिंजवडीत विनयभंगाच्या घटना; पोलीस आयुक्तांच्या बदलीनंतर उपक्रम बासनात
पिंपरी : पुणे शहर पोलिसांच्या माध्यमातून तत्कालीन पोलीस अयुक्त रश्मी शुक्ला यांच्या पुढाकाराने हिंजवडी, वाकड परिसरातील महिलांसाठी सुरक्षिततेच्या विविध उपाययोजना, उपक्रम राबविण्यात आले. त्यामध्ये वॉक विथ कमिशनर, बडी कॉप आणि प्रतिसाद अॅप आदी उपक़्रमांचा समावेश होता. तत्कालीन पोलीस आयुक्त शुक्ला यांची बदली झाली. अन् पुन्हा हिंजवडीत महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
हिंजवडीत एका उच्चभ्रू वसाहतीत फेरफटका मारण्यासाठी बाहेर आलेल्या तरुणीचा विनयभंग केल्याची घटना घडली. तरुणाने फेरफटका मारणाऱ्या मुलीला मिठी मारली. याप्रकरणी पोलिसांनी तरुणास अटक केली आहे. महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने राबविलेल्या उपाययोजनांमध्ये ‘बडी कॉप’ या उपक्रमाचे कौतुक झाले होते. बडी कॉप उपक्रमात आयटीपार्क परिसरात राहणाºया नोकरदार महिला आणि शिक्षण घेणाºया तरुणी यांचे व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आले. नोकरदार महिला आणि तरुणींनी कामाच्या ठिकाणी काही समस्या असतील तर बडी कॉपच्या माध्यमातून त्या समस्या व्यक्त कराव्यात. बडी कॉपमध्ये काही महिला पोलीस अधिकारी आहेत, त्यांच्या माध्यमातून तातडीने अडचणीत असणाºया महिलांना मदत मिळू शकते. त्या समस्येवर तोडगा काढण्याची यंत्रणा कार्यान्वित केली होती.
तळवडे सॉप्टवेअर पार्कमधील अभियंता तरुणी अंतरा दास हिचा खून झाला. त्यानंतर हिंजवडीतील आयटी कंपनीत काम करणाºया रसिला राजू ओपी या तरुणीचा गळा आवळून खून करण्यात आला. या घटनेमुळे आयटी क्षेत्रात काम करणाºया महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला. पुणे शहर पोलिसांनी याची गंभीर दखल घेऊन विविध उपाययोजना आखल्या गेल्या. थेट पोलीस आयुक्त कार्यालयात जाऊन अशा समस्या मांडण्यास तरुणी पुढे येऊ लागल्या. पोलीस महिला सुरक्षा अभियानाचा गवगवा झाला. महिला सुरक्षिततेच्या समस्या मात्र अद्यापही तशाच आहेत. नव्याने झालेल्या आयुक्तालयांतर्गत आता हिंजवडी पोलीस ठाण्याचा समावेश झाला आहे.
आयुक्तालयांकडून महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने काय उपाययोजना केल्या जाणार? याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. विशेषत: हिंजवडी, वाकड या परिसरात नोकरदार महिला आणि शिक्षण घेणाºया तरुणी अशा महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ठोस उपाययोजना अंमलात आणल्या जाव्यात, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. केवळ विनयभंग आणि बलात्काराच्या घटनाच नाहीत, तर सोनसाखळी चोरीच्या घटनांचे प्रमाण मोठे आहे.