Pimpri Chinchwad: मराठा आंदोलनामुळे आमदार, खासदारांची सुरक्षा वाढवली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 09:15 PM2023-10-31T21:15:01+5:302023-10-31T21:16:08+5:30
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आरक्षणाच्या महाराष्ट्रभर विविध ठिकाणी आमरण उपोषण व साखळी उपोषण सुरू आहे...
पिंपरी :मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्रभर विविध ठिकाणी आंदोलन तीव्र होऊ लागले आहे. त्यामुळे शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभेतील आमदार आणि मावळचे खासदार यांच्या निवासस्थानाची सुरक्षा वाढवली आहे. कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आरक्षणाच्या महाराष्ट्रभर विविध ठिकाणी आमरण उपोषण व साखळी उपोषण सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३० दिवसांत आरक्षण मागणी मान्य करतो, असे आश्वासन दिले होते. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला ४० दिवसांचा वेळ दिला व आंदोलन स्थगित केले. सरकार आरक्षण मागणी मान्य करू शकले नाही. सात दिवस झाले तरी सरकार निर्णय घेऊ शकले नाही. त्यामुळे शहरातील विविध भागात आंदोलन सुरू आहे. आमरण उपोषण व साखळी उपोषण सुरू आहे. पिंपरी चिंचवडमधील पवना नदीतीरावरील मोरया गोसावी घाटावर मराठा समाजाने राज्य सरकारचा दशक्रिया विधी असे आंदोलन केले. मराठा समाजात प्रचंड संताप निर्माण झाला आहे, तर काही ठिकाणी आमदारांच्या घरासमोर आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे पोलिसांनी दक्षता म्हणून सुरक्षा वाढवली आहे.
खासदार बारणे यांच्या निवासस्थानी सुरक्षा वाढवली
थेरगाव येथील डांगे चौकाजवळ मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांचे श्री हे निवासस्थान आहे. शेजारीच त्यांचे कार्यालय आहे. तेथील सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. बंदूकधारी पोलिस त्याठिकाणी तैनात आहेत. निवासस्थान आणि कार्यालय येथे पोलिस तैनात आहेत.
आमदारांच्या घरी बंदोबस्त
१) भोसरीचे आमदार महेश लांडगे याचे भोसरीतील मंडईजवळ निवासस्थान आणि भोसरीत कार्यालय आहे. तिथे पोलिस बंदोबस्त तैनात आहे. पोलिस कर्मचारी चोवीस तास पहारा देत आहेत.
२) पिंपळेगुरव येथील महापालिका शाळेजवळ चिंचवडचे आमदार अश्विनी जगताप यांचे चंद्ररंग निवासस्थान आहे. तसेच भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप हेही येथेच वास्तव्यास आहेत. जवळच आमदार जगताप यांचे कार्यालय आहे. तिथेही सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.
३) काळभोरनगर चिंचवड येथे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांचे कार्यालय आहे, तसेच त्यांच्या निवासस्थानी तिथेही सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.
४) विधान परिषद सदस्य उमा खापरे यांचे चिंचवड येथील रामकृष्ण नाट्यगृह जवळ निवास स्थान आहे, तसेच थेरगाव येथे कार्यालय आहे. तिथेही सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.