सुरक्षा रामभरोसे; सोसायटीत सुरक्षा करण्याऐवजी रक्षक गाढ झोपेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 02:34 AM2018-11-01T02:34:05+5:302018-11-01T02:34:26+5:30
वाकड पोलिसांच्या पथकाने ३५० सोसायट्यांत मध्यरात्री केली पाहणी
वाकड : दिवाळीचा सण आणि दिवाळी सुट्या अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपल्याने गावाकडे अथवा सहलीला जाणाऱ्या कुटुंबीयांची संख्या मोठी असते. याचाच फायदा घेत चोरटे कार्यरत होतात. बंद सदनिका फोडून ते स्वत:ची ‘दिवाळी’ करतात. हा सर्वांचा अनुभव लक्षात घेता वाकड पोलिसांनी बुधवारी पहाटे अडीच ते चार या वेळेत वाकड परिसरातील सोसायट्यांमध्ये पाहणी करून आढावा घेतला. ज्यांच्या भरवशावर सदनिकाधारक बिनधास्त आणि बिनघोर असतात, असे तब्बल ६० टक्क्यांहून अधिक सोसायट्यांत सुरक्षारक्षक गाढ झोपेत असल्याचे आढळल्याने येथील सोसायट्यांची सुरक्षा ‘रामभरोसे’ असल्याचे वास्तव समोर आले आहे.
वाकड पोलिसांनी बुधवारी मध्यरात्रीनंतर ही मोहीम राबविली. वाकड परिसरातील तब्बल ३५० सोसायट्यांमधील सुरक्षा यंत्रणेचा आढावा या वेळी त्यांनी घेतला. त्यावेळी हे धक्कादायक वास्तव समोर आले. याबाबत त्यांच्या असेल त्या अवस्थेतील फोटो काढून ती माहिती संबंधित सोसायटी व सुरक्षारक्षक एजन्सीला कळविण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी पहाटे दोन वाजता वाकड पोलीस ठाण्यातील ७० पोलीस कर्मचारी व पाच अधिकाºयांकडून वाकडमधील सोसायट्यांची यादी व त्यांची माहिती याचे या पूर्वीच संकलन करण्यात आले होते. त्यानुसार तपास पथकाचे प्रमुख उपनिरीक्षक हरीष माने यांनी कर्मचाºयांना सूचना देऊन प्रत्येकी दोन कर्मचाºयांची ३५ पथके तयार केली. प्रत्येक पथकाला नियोजनानुसार दहा सोसायट्यांचा आढावा घेण्याचे ठरले. या वेळी पोलिसांनी ३५० सोसायट्यांमध्ये तपासणी केली.
रक्षकांनी राहावे सतर्क
वाढत्या घरफोड्या, चोºयांना प्रतिबंध घालण्याची सुरक्षारक्षकांचीदेखील जबाबदारी तेवढीच आहे. त्यामुळे सुरक्षारक्षकांनी कसे सतर्क राहावे, आणीबाणीच्या काळात काय करावे याबाबत वाकड पोलिसांनी वाकड, हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरक्षारक्षक व सोसायट्यांतील पदाधिकाºयांची कार्यशाळा घेतली होती. ही कार्यशाळा होताच त्याच दिवशी पहाटे वाकडमधील एका सोसायटीत चोरीचा प्रयत्न झाला होता. त्याच्या पार्श्वभूमीवर सोसायटींमधील सुरक्षारक्षक किती सतर्क आहेत याचा आढावा घेतला.